दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका जोडप्याला विवाहबाह्य संबंध ठेवले म्हणून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाल्याचं दिसून आलं. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावाही झाला. या पार्श्वभूमीवर आता सदर घटनेतील पीडित महिलेनं आपली भूमिका मांडली आहे. “आता मी घरी परत जाणार नाही, मला माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगता येणार आहे”, असं या महिलेनं म्हटलं आहे.
काय घडलं होतं पश्चिम बंगालमध्ये?
पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक भागात एका गावात पंचायत सभेसमोर एका प्रेमी युगुलाला मारहाणा करण्यात आली. २८ जून रोजी हा प्रकार घडला. या घटनेतील ३५ वर्षीय प्रियकर व ३८ वर्षीय प्रेयसी हे दोघे विवाहित असून त्या दोघांनीही विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. तसेच, आता आपल्याला हेच आयुष्य हवं आहे, असा निर्धारही या दोघांनी व्यक्त केला आहे. या संबंधांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्तेही होते, असा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी यासंदर्भात कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणात मारहाण करणारा ताजिमुल इस्लाम हा प्रमुख आरोपी आहे.
पीडित महिलेनं मांडली व्यथा
दरम्यान, या सपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती मारहाण झालेली महिला. या महिलेला तिच्या प्रियकरापेक्षा जास्त मारहाण करण्यात आली. मात्र, आता आपल्याला आपल्या इच्छेनुसार जीवन जगायचं आहे, असा निर्धार या महिलेनं व्यक्त केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. “पाच वर्षांपूर्वी आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला आम्ही लपून-छपून भेटत होतो. पण नंतर माझ्या पतीा यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानं मला घर सोडून जायला सांगितलं. २७ जूनला मी माझ्या प्रियकराच्या घरी गेले”, असं या महिलेनं सांगितलं.
“अनेक ग्रामस्थांना माझा हा निर्णय आवडला नाही. २८ जूनला त्यांनी यासाठी पंचायतीसमोर बैठक बोलावली. त्यात तृणमूलचा कार्यकर्ता ताजिमुल इस्लाम उर्फ जेसीबी आला. त्यानं आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. त्याचं पाहून इतरही लोक पुढे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. हे कधी ना कधी घडेल याची मला कल्पना होती. पण या घटनेचा व्हिडीओ इतका व्हायरल होईल, असं मला वाटलं नव्हतं”, असंही या महिलेने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे.
“मला लाथा मारल्या, शिवीगाळ केली”
“मी ताजिमुल इस्लामला ओळखत नाही. मी त्याला पाहिलंही नव्हतं. आता मी ठीक आहे. माझ्या प्रियकराचं घरच आता माझं घर आहे. मी आता परत जाणार नाही. मी प्रेमात पडले म्हणून मला लाथा मारल्या गेल्या. मारहाण झाली. शिवीगाळ झाली. पण कदाचित मी समाजाचे नियम मोडले म्हणून हे झालं असावं”, असंही पीडितेनं नमूद केलं.
“मला दोन मुलं आहेत. पण आता ते मोठे झाले आहेत. आता मला माझं आयुष्य जगू द्या. मला न्याय मिळेल आणि त्यानंतर मी सुखाने राहू शकेन हे मला माहिती होतं. मी त्या दिवशी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण तुम्ही व्यवस्थेला आव्हान देऊ शकत नाही”, अशी हतबल प्रतिक्रिया या महिलेनं दिली आहे.