देशात मान्सूनने दिमाखात आगमन केलं आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हरियाणातील पंचकुला येथील खरक मांगोली येथे विचित्र घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे नदीत अचानक पाणी आल्याने एक महिला कारसह वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला पंचकुला येथील खरक मांगोली परिसरात देवाची पूजा करण्यासाठी आली होती. यावेळी पीडित महिलेनं आपली कार नदीच्या काठावर लावली. दरम्यान, अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली. यावेळी महिलेनं नदीच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती कारसह वाहून गेली. त्यानंतर काही अंतरावर कार अडकली.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोरखंडाच्या मदतीने महिलेला कारमधून बाहेर काढलं. १०-१५ जणांनी काही मिनिटं अथक प्रयत्न केल्यानंतर महिलेला बाहेर काढण्यात यश आलं.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, पंचकुला येथील खरक मांगोली येथे पावसामुळे नदीतील पाणी पातळी अचानक वाढली. यामध्ये एका महिलेची कार वाहून गेली. ही कार नदीच्या काठाजवळ उभी केली होती. संबंधित महिला येथील एका मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.