Woman Chef from Bangalore: कामाच्या ठिकाणचा अतिताण सहन न झाल्यामुळे पुण्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याचं वृत्त ताजं असतानाच आता असे अनेक अनुभव सोशल मीडियासह इतर ठिकाणी शेअर होताना दिसत आहेत. बंगळुरूतील एका ३२ वर्षीय शेफनं नुकताच तिला कामाच्या ठिकाणी आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. इकोनॉमिक्स टाईम्सनं द नॉड मॅगझिनच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. नयनतारा मेनन बागला असं या महिलेचं नाव असून मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं आपला अनुभव कथन केल्याचं इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

“जेव्हा मला बंगळुरूतल्या एका आलिशान हॉटेलच्या किचन स्टाफमध्ये समाविष्ट करण्यात आलं, तेव्हा आमच्या प्रोग्रॅम डायरेक्टरनं माझं स्वागत एका वाक्यात केलं. तो म्हणाला, ‘नरकात तुमचं स्वागत आहे’. आमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही समस्या असली तरी कामावर हजर राहण्याची सक्ती होती. आमचं ब्रेकअप झालं असो किंवा कुटुंबात कुणाचं निधन झालं असो, तरी चेहऱ्यावर मेकअप करून आम्ही हसत ग्राहकांचं स्वागत करणं अपेक्षित असायचं”, असं या महिला शेफनं सांगितल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रोज १८ ते २० तास काम!

दरम्यान, या हॉटेलमध्ये तब्बल १८ ते २० तास रोज काम करावं लागत होतं, असं या शेफनं म्हटलं आहे. “या हॉटेलमध्ये आम्ही रुजू झालो तेव्हाचा अनुभव तर फक्त सुरुवात होती. पुढे परिस्थिती अधिक वाईट होत गेली. आम्हाला १८ ते २० तासांच्या शिफ्ट लावल्या जायच्या. वरीष्ठ कनिष्ठांचं शोषण करायचे. त्यांच्याकडून सगळी कामं करून घ्यायचे”, असा अनुभव त्यांनी सांगितला.

उशीर झाला तर दोन तास हात वर करून उभं राहायचं!

“त्यांनी मला वजनही कमी करायला सांगितलं होतं. शिवाय, महिलांनी किचनमध्ये पुरुषांच्या हाताखाली काम करायला हवं, असं सांगितलं जायचं. त्यांनी तर मला माझा अॅटिट्युडही बदलायला लावला. कल्पना करा, घरी आईच्या कर्करोगावर उपचार चालू असताना एकही दिवस सुट्टी न घेता मी काम करत होते. कारण तो हॉटेलचा ‘सीजन’ होता. जर तुम्ही कामावर उशीरा आले, तर तुम्हाला किमान दोन तास बाहेर हात वर करून उभं राहायला लावलं जायच किंवा कोणत्याही कापडाशिवाय हातांनी हॉटेलमधले सगळे फ्रीज साफ करावे लागायचे”, असं या महिला शेफनं नमूद केलं.

पुण्यातील तरुणीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे? जास्त कामाचा तिच्या प्रकृतीवर कसा परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना कामाचा ताण?

पुण्यात EY कंपनीमधील एका २६ वर्षीय तरुणीचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. रुग्णालयात उपचारांदरम्यान या तरुणीचं निधन झालं. त्यानंतर तिच्या पालकांनी कामावरच्या ताणामुळे तिचा मृत्यू ओढवल्याचा दावा केला. यासंदर्भात त्यांनी कंपनीच्या संचालकांना पत्र लिहून आपली व्यथाही सांगितली होती. मात्र, कंपनीकडून त्यांचे दावे फेटाळून लावण्यात आले होते.