Who Will Become Delhi CM : दिल्ली विधानसभेत भाजपानं ऐतिहासिक असा विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिल्लीत १९९८ नंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री सत्तारूढ होणार आहे. त्यामुळे या मुख्यमंत्रीपदाबाबत सत्ताधारी भाजपाप्रमाणेच विरोधी पक्षांमध्येही उत्सुकता असून नेमकी कुणाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. एकीकडे दिल्ली भाजपातील दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत असताना आता दिल्लीत महिला मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्याअनुषंगाने भाजपाच्या काही प्रभावी महिला आमदारांचीही नावं सांगितली जात आहेत.
८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपानं ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला. आम आदमी पक्षाला उरलेल्या २२ जागा मिळाल्या. यात खुद्द दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचादेखील भाजपाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र परवेश वर्मा यांनी पराभव केला. सर्व ७० जागा या दोन पक्षांनीच जिंकल्या असून काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळा फोडण्यात अपयश आलं आहे.
मुख्यमंत्रीपदासाठीच्या शर्यतीत चार महिला आमदार
दरम्यान, दिल्लीत मोठा विजय मिळवल्यानंतर आता भाजपाच्या अंतर्गत गोटामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावांवर चर्चा होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर असून ते परत आल्यानंतरच दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडेल. पण त्याआधी नावावर शिक्कामोर्तब झालं असेल, असं सांगितलं जात आहे. दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री सत्तारूढ असेल, अशी चर्चा चालू असून त्यात चार नवनिर्वाचित महिला आमदारांचा समावेश आहे. या चारही आमदारांनी मोठ्या फरकाने विरोधी उमेदवाराचा पराभव केला आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत सर्वात वर असणाऱ्या रेखा गुप्ता यांनी शालिमार बाग विधानसभा मतदारसंघात ६८ हजार २०० मतांनिशी विजय मिळवला. आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा त्यांनी तब्बल २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला. त्यांच्यापाठोपाठ दुसरं नाव घेतलं जातंय ते शिखा रॉय यांचं. ग्रेटर कैलाशमध्ये शिखा रॉय यांनी आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते, माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांना ३ हजार १८८ मतांनी पराभूत करत ४९,५९४ मतांनिशी विजय साजरा केला.
या दोन नावांव्यतिरिक्त पूनम शर्मा व नीलम पेहलवान यांनीही विरोधी उमेदवाराचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे. त्यात पूनम शर्मा यांनी वझीरपूरमध्ये आपचे राजेश गुप्ता यांचा ११,४२५ मतांनी तर नीलम पेहलवान यांनी नजफगडमध्ये आपच्या तरुण कुमार यांचा २९,००९ मतांनी पराभव केला आहे.
परवेश वर्मांचं नाव आघाडीवर
महिला उमेदवारांच्या नावाची चर्चा होत असताना परवेश वर्मांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खुद्द केजरीवाल यांना हरवणारे परवेश वर्मा हे निकाल लागल्यापासूनच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदी महिला उमेदवार आल्यास परवेश वर्मा यांना सरकारमध्ये वेगळी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवणं भाजपा पक्षश्रेष्ठींसाठी क्रमप्राप्त ठरेल.
उपमुख्यमंत्रीपदाची तरतूद?
दरम्यान, भाजपाच्या दिल्लीतील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीही असतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी महिला उमेदवार आल्यास उपमुख्यमंत्रीपदी परवेश वर्मा यांची वर्णी लागू शकते. त्याशिवाय नव्या सरकारमध्ये महिला व दलित आमदारांना योग्य प्रकारे सामावून घेतलं जाईल, असंदेखील म्हटलं जात आहे.