ऑनलाईन फूड प्रणाली आता मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होऊ लागली आहे. अनेक कंपन्या अशा प्रकारे फूड डिलीव्हरीची सेवा पुरवतात. मात्र, अशाच पद्धतीने ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्यानंतर एका २० वर्षीय तरुणीचा मृत्यू ओढवल्याचं वृत्त द न्यूज मिनटनं दिलं आहे. बिर्याणी खाल्ल्यामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून त्याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. केरळच्या कासारगोडाजवळील पेरुंबाला भागात राहणाऱ्या अंजू श्रीपार्वती या तरुणीच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिले आहेत.
नेमकं घडलं काय?
३१ डिसेंबर रोजी अंजूनं एका ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कुझी मंडी बिर्याणी मागवली. यानंतर तिला त्रास होऊ लागल्यामुळे स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला मंगळुरूमधील रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. “अन्न सुरक्षा आयुक्तांना यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी या प्रकरणात लक्ष घालत आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली. “अन्न सुरक्षा निर्देशांनुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे आरोप असणाऱ्या हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येतील”, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, संबंधित हॉटेलची अन्न सुरक्षा सहायक आयुक्तांनी पाहणी केली असता हॉटेल स्वच्छ असल्याचं त्यांना आढळून आलं.
काही दिवसांपूर्वी कोट्टायम मेडिकल कॉलेजमधील नर्सचाही कोझीकोडेमधील एका हॉटेलातील अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच हॉटेलमधील अन्न खाल्ल्यानंतर इतरही २० लोकांना त्रास जाणवू लागल्याचंही सांगितलं गेलं.