अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कितीही प्रयत्न झाले, तरीही अजून अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचा पगडा लोकांवर दिसून येतो. अशाच एका अंधश्रद्धेतून एका आईनं पोटच्या चिमुकल्याला गंगा नदीत बराच वेळ बुडवून ठेवलं. यात मुलाचा आजार बरा होईल, असं मुलाच्या आई-वडिलांना वाटत होतं. पण पाण्यात बराच काळ राहिल्यामुळे या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना हरिद्वारमध्ये घडली आहे. हरिद्वारमधील हर की पौरी घाटावर हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटिझन्सकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय झालं?

बुधवारी हरिद्वारमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या मुलासह गंगेच्या पाण्यात उतरल्याचं दिसून आलं. प्रथमदर्शनी आसपासच्या लोकांना हा नेहमीचाच प्रकार वाटला. हरिद्वारला गंगा नदीत लाखो भाविक स्नान करत असतात. मात्र, बराच वेळ या महिलेनं तिच्या लहान मुलाला पाण्याबाहेर न काढल्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली. जेव्हा पुढे जाऊन काही नागरिकांनी विचारपूस करायला सुरुवात केली तेव्हा खरा प्रकार समोर आला.

आपल्या मुलाचा मोठा आजार बरा करण्यासाठी त्याला गंगेच्या पवित्र पाण्यात ठेवलं, तर त्याला यश येईल, अशी या महिलेची धारणा होती. त्यातून तिनं ५ वर्षांच्या चिमुकल्याला गंगा नदीत अक्षरश: बुडवून ठेवलं. महिलेनं मुलाला बाहेर न काढल्यामुळे तिथल्याच एका व्यक्तीनं पुढाकार घेत त्या दाम्पत्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानं हट्टानंच महिलेच्या हातातून मुलाला हिसकावून घेतलं आणि पाण्याबाहेर काढलं. त्यावर त्या महिलेनं उलट त्या व्यक्तीशीच वाद घालायला सुरुवात केली. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

खाली खोल दरी अन् दोरीच्या मदतीने गड चढतोय चिमुकला! पाहा, अंगावर काटा आणणारा धाडसी Video

मुलाला होता रक्ताचा कर्करोग

इंडिया टुडेनं पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या मुलाला रक्ताचा कर्करोग झाला होता. गंगा नदीपर्यंत त्यांना सोडणाऱ्या टॅक्सीचालकानंही प्रवासात ते दोघे मुलाचा आजार आणि गंगेतील आंघोळ यावरच चर्चा करत होते अशी माहिती दिली. गंगेवर येण्याआधी या दाम्पत्यानं मुलाला रुग्णालयातही दाखवलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याची परिस्थिती गंभीर झाल्याचं नमूद केलं. त्यानंतर हे दाम्पत्य गंगेत स्नान केल्यानं मुलाचा आजार बरा होईल, या धारणेतून तिथे आलं आणि पुढचा सगळा प्रकार घडला.

“हा आत्ता उठून उभा राहील”

चिमुकल्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर बराच वेळ त्याची आई त्याला मांडीवर घेऊन विमनस्क अवस्थेत हसत असल्याचं दिसून आलं. आपला मुलगा आत्ता उठून उभा राहील, असं वारंवार म्हणत ही महिला मधूनच हसत असल्याचंही दिसून आलं. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

Live Updates

Story img Loader