इस्रायल आणि गाझादरम्यान २४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाला आणखी मुदतवाढ मिळण्याचे प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. शस्त्रविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर दोषारोप केला. दरम्यान, इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेत याचा निषेध केल गेला आहे. पॅलेस्टिनी ध्वज गुंडाळून एका महिला आंदोलकाने शुक्रवारी दुपारी अमेरिकेतील अटलांटा येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये महिला गंभीर जखमी असून राजकीय निषेधाचे टोकाचे कृत्य असल्याची प्रतिक्रिया येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हातात पॅलेस्टिनी ध्वज घेऊन ही महिला वाणिज्य दूतावासाबाहेर आली. त्यानंतर ध्वज तिने स्वतःभोवती गुंडाळला आणि पेटवून घेतले, असे पोलीस प्रमुख डॅरिन शिअरबॉम यांनी सांगितले. डेली बीस्टच्या वृत्ताच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले.
शियरबॉम पुढे म्हणाले की एका सुरक्षा रक्षकाने महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. तसंच, यामध्ये सुरक्षा रक्षकही जखमी झाला. त्यानंतर, आग विझवण्यात आली आणि गंभीर भाजलेल्या महिलेला जवळच्या ग्रेडी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शियरबॉमने म्हणाले, ही घटना दहशतवादी कृत्य नव्हती, परंतु एक आठवड्याच्या युद्धविरामानंतर शुक्रवारी पुन्हा सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या निषेधाचा एक प्रकार होता.
हेही वाचा >> इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू, आठवडाभराचा शस्त्रविराम समाप्त; इस्रायलचे गाझावर हवाई हल्ले
दरम्यान, आग्नेय अमेरिकेतील इस्रायलचे वाणिज्य दूतावास अनत सुलतान-दादोन यांनी निवेदन जारी केले. ते म्हणाले, “कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर आत्मदहन झाल्याची माहिती मिळाल्याने आम्हाला दुःख झाले आहे. इस्त्रायलबद्दलचा द्वेष आणि चिथावणी अशा भयंकर रीतीने व्यक्त होणे हे दुःद आहे. जीवनाचे पावित्र्य हे आमचे सर्वोच्च मूल्य आहे. हे दुःखद कृत्य रोखण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या सुरक्षा अधिकाऱ्यासाठी आमची प्रार्थना आहे.”
हेही वाचा >> “इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू, कारण…”, अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
जवळपास ३४० जणांची सुटका..
एक आठवडय़ाच्या शस्त्रविरामाच्या काळात हमासने १०० पेक्षा जास्त ओलिसांची सुटका केली. त्यामध्ये प्रामुख्याने महिला, मुले आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हमासच्या ताब्यात सुमारे १२५ जण अद्याप ओलीस आहेत अशी माहिती इस्रायलने दिली. या कालावधीत इस्रायलने सुमारे २४० पॅलेस्टिनी किशोरवयीन मुले आणि तरुणांची सुटका केली. यापैकी बहुतांश जणांना इस्रायली फौजांवर दगडफेक केल्याचा आणि फायरबॉम्ब फेकल्याचा आरोप होता.