बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील इटाढी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बालादेवा गावात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉम्ब फुटून येथील एक महिला जबर जखमी झाली आहे. स्थानिक रुग्णालयात योग्य उपचार होऊ न शकल्याने या महिलेला वाराणसीच्या रुग्णलयात हलवण्यात आलं. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बालादेवा गावातील रामनाथ राम यांची पत्नी शांती देवी (६५) यांनी गूळ समजून बॉम्ब फोडला. या स्फोटात ती जबर जखमी झाली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक मनीष कुमार म्हणाले की, ही महिला घरात काहीतरी कुटण्याचं काम करत होती. ते करत असताना अचानक स्फोट झाला. महिलेच्या घरातील सदस्यांनी सांगितलं की, शांती देवी सकाळी काहीतरी कुटण्याचं काम करत होत्या. त्यांनी पहाटे चारच्या सुमारास गडद अंधार असताना घरातलं काहीतरी साहित्य घेतलं. गुळाची ढेप समजून त्यांनी ती वस्तू कुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोठा स्फोट झाला. दरम्यान, तिथे अजून बॉम्ब असू शकतात, या भितीने बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं. परंतु या पथकाला कोणतंही स्फोटक आढळलं नाही.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालादेवा गावातील रामनाथ राम यांची पत्नी सकाळी चारच्या सुमारास चहा बनवण्यासाठी गुळाची ढेप समजून कुटत होती. तिने ती वस्तू कुटण्याचा प्रयत्न करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज ऐकून आसपासचे लोक घाबरले. सर्वांनी रामनाथ राम यांच्या घराकडे धाव घेतली. तसेच घरातली मंडळी छतावर पोहचली. सर्वांनी पाहिलं की, शांती देवी जखमी अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना आधी बक्सर प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी वाराणसीला रेफर करण्यात आलं.
हे ही वाचा >> महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “जवळपास सर्वांनी मान्य केलंय की…”
पोलीस सर्व बाजूंनी घटनेचा तपास करत असले तरी अद्याप काहीही हाती लागलेलं नाही. पोलीस नक्षलवादी अँगल तपासत आहेत. त्याचबरोबर या घटनेनंतर परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.