विमानातील प्रवासी विकृत वागणूक करत असल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत समोर आलेली आहेत. सहप्रवाशांवर लघुशंका करणे, क्रू सदस्यांना मारहाण करणे, महिला प्रवाशांनी स्वतःचेच कपडे उतरवणे असे अनेक प्रकार विमानात घडले आहेत. आता कोलकाताहून अबू धाबीला जाणाऱ्या इत्तिहाद कंपनीच्या विमानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर विमानात एक महिलेला सहप्रवाशाने पॉर्न व्हिडीओ दाखवून स्वतःकडे खेचून घेतल्याचा आरोप होत आहे. हे आरोप प्रसिद्ध उद्योगपती, खासदार नवीन जिंदल यांच्या जिंदल स्टील अँड पॉवर लि. या कंपनीच्या सीईओंवर झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विमान अबू धाबीला उतरताच आरोपी सीईओला ताब्यात घेतले गेले.

पीडित महिलेचे नाव अनन्या छोछरिया असून तिने हा सर्व घटनाक्रम आपल्या एक्स अकाऊंटवर कथन केला आहे. तसेच नवीन जिंदल यांनाही टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. नवीन जिंदल यांनीही अनन्याच्या धाडसाचे कौतुक केले असून आरोपीची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासित केले आहे.

हे वाचा >> Air India flight lands Russia : एअर इंडियाचं दिल्लीहून अमेरिकेला निघालेलं विमान रशियाकडे वळवलं! काय घडलं?

नेमके प्रकरण काय?

अनन्या छोछरिया इतिहाद कंपनीच्या विमानाने कोलकाताहून अबू धाबीला जात होती. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, माझ्या शेजारी जिंदल कंपनीचे सीईओ दिनेश सरोगी बसले होते. त्यांचे वय जवळपास ६५ पर्यंत असावे. त्यांनी मला त्यांच्याबद्दल माहिती दिली आणि माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाची पार्श्वभूमी वैगरे सांगून त्यांनी माझीही पार्श्वभूमी जाणून घेतली.

अनन्याने पुढच्या पोस्टमध्ये म्हटले की, आमचा संवाद पुढे जात असताना त्यांनी माझे छंद काय आहेत, हे जाणून घेतले. ते म्हणाले की, तुला चित्रपट पाहायला आवडतात का? मी हो म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचा फोन बाहेर काढला आणि त्यावर काही चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. फोन आणि इअरफोन बाहेर काढून त्यांनी मला पॉर्न व्हिडीओ दाखविले आणि मला जवळ ओढायला लागले. या प्रकारामुळे मला धक्काच बसला आणि भीतीही वाटली.

“दरम्यान मी वॉशरुमला जायचे असल्याचे सांगून तिथून उठले आणि तिथून निसटले. एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार केली. इतिहास एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनीही झाल्या प्रकाराची तातडीने दखल घेऊन मला मदत केली. कर्मचाऱ्यांनी मला ते बसतात त्याठिकाणी बसू दिले आणि चहा, फळे खायला दिली. मात्र तरीही ते सीईओ माझ्याबद्दल कर्मचाऱ्यांना विचारणा करत होते. दरम्यान कर्मचाऱ्यांनी अबू धाबीमधील पोलिसांनाही याची माहिती दिली. विमान उतरताच त्यांनी सीईओंना ताब्यात घेतले”, अशी माहिती अनन्याने दिली.

अनन्या पुढे म्हणाली की, मला अबू धाबीवरून बोस्टनची कनेक्टेड विमान पकडायचे असल्यामुळे मी विमानतळावर तक्रार करू शकले नाही. पोलिसांनी जेव्हा सीईओंना याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनीही झाला प्रकार मान्य केला. मी हे आज जाहीरपणे सांगत आहे. कारण असा प्रसंग कुणाबरोबरही घडू शकतो.

दरम्यान अनन्याने नवीन जिंदल यांना टॅग करून तक्रार केल्यानंतर त्यांनीही याचा निषेध व्यक्त केला. या प्रकाराचे कुणीही समर्थन करू शकत नाही. आमची कंपनी अशा प्रकारांना खपवून घेत नाही. आम्ही याचा संपूर्ण तपास करून कारवाई करू, असे त्यांनी आश्वासित केले.