Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथे पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा बनाव केल्या प्रकरणी एका महिलेला आणि तिच्या दोन साथिदारांना अटक करण्यात आली आहे. खोट्या आरोपात स्थानक लोकांना अडकवून त्यांच्याकडून पैसै उकळण्यासाठी या महिलेचा डाव होता. यासाठी तिने स्वतःच्या खांद्यामध्ये वैद्यकीय शस्त्रक्रियेमध्ये बंदुकीची गोळी देखील बसवून घेतली होती. दरम्यान पोलिसांनी महिलेबरोबरच तिचा साथिदार शराफत खान (५०) याला आणि बरेली सरकारी रुग्णालयातील वॉर्ड बॉयला देखील ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या महिलेसह दोन्ही आरोपींना जेव्हा कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, अशी माहिती बरेलीचे पोलिस अधीक्षक मानुश पारीख यांनी दिली. पोलिसांनी तिघांवर खंडणी, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान उघड झाले की महिलेने एका स्थानक नेता आणि इतरांकडून पैसे उकळण्याची योजना आखली होती. २०२२ मध्ये सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात देखील या महिलेने हिच पद्धत वापरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीने काही जणांना अडकवण्याचा तिचा हेतू होता.
पोलिसांनी सांगितले की, ही महिला तीन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेली आणि त्यांच्याकडे खांद्यात बंदुकीची गोळी बसवून देण्याची विनंती केली. पण सर्व डॉक्टरांनी असे करण्यास नकार दिला. त्यानंतर ती एका नकली डॉक्टराकडे गेली ज्याने २,५०० रूपयांच्या बदल्यात तिच्या खांद्यात गोळी बसवून देण्याचे मान्य केले.
पोलिसांनी सांगितेल की, या योजनेत सहभागी असलेल्या ५० वर्षीय वॉर्ड बॉयने बंदुकीची गोळी खरेदी केली आणि नंतर ती गोळी या महिलेच्या खांद्यात बसवण्यात आली.
पोलिसांनी पुढे खुलासा केला की, २९ मार्च रोजी महिलेला गोळी लागल्याच्या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. यावेळी महिलेने दावा केला की, ती औषधांच्या दुकानात जात असताना पाच पुरुषांनी कारमधून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्यावर गोळी झाडून जखमी अवस्थेत तिला सोडून गेले.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि सीसीटीव्ही फुटेज देखील गोळा केले, ज्यामध्ये दिसून आले की महिला ही घटनास्थळी स्वतः आली होती आणि ती सतत तिचा फोन वापरत होती, ज्यामुळे तिने दिलेल्या जबाबावर पोलिसांना संशय आला. तसेच तिच्या वैद्यकीय तपासणीनंतर शंका आणखी बळावली, कारण गोळी लागल्याची खून शरीरावर दिसत नव्हती, उलट गोळी झाडण्याऐवजी तिच्या त्वचेच्या खाली ठेवल्याचे दिसून येत होते. .
तपासादरम्यान पोलिसांनी महिलेची पार्श्वभूमी तपासली असता त्यांना आढळले की, २०२२ मध्येही महिलेने असेच आरोप केले होते, ज्यामध्ये गोळीबाराच्या घटनेचा देखील समावेश होता.