नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्यांच्या बँक खात्यांतील व्यवहारांची कसून चौकशी केली जात असतानाच, ‘डोळे पांढरे फटक’ पडतील, अशी घटना समोर आली आहे. महिन्याला ५ हजार रुपये कमावणाऱ्या एका कर्मचारी महिलेच्या मेरठ येथील बँकेतील जनधन खात्यात तब्बल १०० कोटी रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे समजताच या महिलेला धक्काच बसला. तिने तातडीने पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली आहे.
स्टेट बँकेच्या शारदा रोड येथील शाखेत शीतल यादव या महिलेचे जनधन खाते आहे. येथील एका कारखान्यात ती पॅकेजिंग विभागात काम करत असून, महिन्याला ५ हजार रुपये कमावते. १८ डिसेंबरला तिच्या घराजवळील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये ती पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या खात्यात ९९ कोटी ९९ लाख ९९ हजार ३९४ रुपये शिल्लक असल्याचे लक्षात आले. आपल्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचे पाहून तिला धक्काच बसला. तिने रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला खात्यातील रक्कम पुन्हा तपासून पाहण्यास सांगितले. त्यावेळीही इतकीच रक्कम खात्यात असल्याचे सांगितले. याबाबत माहिती देण्यासाठी ती दोन दिवस बँकेच्या शाखेत फेऱ्या मारत होती. पण तिला बँक अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत तिचा पती झिलेदार यालाही शीतलच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचे समजल्यानंतर धक्काच बसला. बँक अधिकारी कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे त्याला समजले. अखेर त्याने उच्चशिक्षित व्यक्तीच्या मदतीने पंतप्रधान कार्यालयाला मेल पाठवून याबाबत माहिती दिली.
बँक खात्यात इतकी मोठी रक्कम कुठून आली, याची चौकशी व्हावी, यासाठी २६ डिसेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाला मेल पाठवला आहे, असे शीतलचा पती झिलेदारने सांगितले. त्याने प्रसारमाध्यमांनाही याबाबत माहिती दिली. आपल्या पत्नीला मिळालेली एटीएमची पावती आणि पासबूकही दाखवले. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी संबंधित बँकेचे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत.