एका प्रॉपर्टी डिलरला आणि त्याच्या भागीदाराला पोलिसांनी एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश या ठिकाणी घडली आहे. शिवेंद्र यादव आणि त्याचा बिझनेस पार्टनर गौरव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवेंद्र यादव आणि गौरव या दोघांनी अंजली नावाच्या २५ वर्षीय तरुणीला मालमत्तेची कागदपत्रं देण्यासाठी बोलवलं. त्यानंतर तिला बळजबरीने दारु प्यायला भाग पाडलं. एवढंच नाही तर यानंतर तिचा गळा आवळला आणि तिला जाळलं. तिचा मृतदेह या दोघांनी नदीत फेकला. अंजली घरातून गेली ती परत आली नाही म्हणून तिच्या कुटुंबाने तक्रार केली होती. पोलीस बेपत्ता अंजलीचा शोध घेत होते. अंजलीचा मृतदेह तिच्या हत्येनंतर पाच दिवसांनी म्हणजेच शनिवारी पहाटेच्या सुमारा एका नदीजवळ पोलिसांना सापडला. आरोपी शिवेंद्र यादवने अंजलीची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तिचा मृतदेह या दोघांना दाखवला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
अंजली घरातून गेल्यानंतर काय घडलं?
अंजली पाच दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडली. ती परत आलीच नाही शिवाय तिच्या कुटुंबाला तिची स्कूटर जळालेल्या अवस्थेत एका गटाराजवळ आढळली. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी शोध घेतला तेव्हा त्यांना अंजलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्र यादव आणि गौरव या दोघांना अटक केली.
अंजलीची बहीण किरणने काय सांगितलं?
अंजलीची बहीण किरणने केलेल्या दाव्यानुसार आरोपींनी अंजलीकडून ६ लाख रुपये घेतले होते. जमिनीच्या बदल्यात हा व्यवहार झाला होता. त्यानंतर जमिनीचे कागदपत्रं घेण्यासाठी अंजली गेली तेव्हा तुलाच ती सगळी कागदपत्रं देत आहोत असं या दोघांनी भासवलं आणि तिची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी यादव आणि गौरव या दोघांना अटक केली आहे. त्यांनी हत्येचा गुन्हा कबूल केला आहे.