नक्षलवादाचा सर्वाधिक फटका बसलेल्यांपैकी एक असलेल्या छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्य़ातील एका तरुणीने मुलकी सेवा परीक्षांमध्ये देशातून बारावा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षांचे निकाल अलीकडेच जाहीर करण्यात आले होते.
दंतेवाडा जिल्ह्य़ातील गीदम शहरातील नम्रता जैन ही २०१६ सालच्या मुलकी सेवा परीक्षांमध्ये ९९ व्या क्रमांकावर होती. तिची भारतीय पोलीस सेवेत निवड होऊन सध्या ती हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.
माझी नेहमीच जिल्हाधिकारी बनण्याची इच्छा होती. मी आठवीत असताना एक महिला अधिकारी आमच्या शाळेत आली होती. ती जिल्हाधिकारी असल्याचे नंतर मला कळले. तिच्यामुळे मी खूप प्रभावित झाले होते. त्याच वेळी मी जिल्हाधिकारी होण्याचे निश्चित केले, असे नम्रताने पीटीआयला हैदराबादहून फोनवर सांगितले.
फार पूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटाचा माझ्या गावातील पोलीस ठाण्याला हादरा बसला होता. यामुळेच गरिबांची सेवा करण्यासाठी आणि या नक्षलवादग्रस्त भागाचा विकास करण्यासाठी मुलकी सेवांमध्ये प्रवेश करण्याबाबत मला प्रोत्साहन मिळाले, असे ती म्हणाली.
मी जिथली रहिवासी आहे, त्या भागात नक्षलवादाचा फार मोठा प्रभाव आहे. तेथील लोकांना शिक्षणासारख्या मूलभूत सोयीही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी माझ्या राज्यांच्या लोकांची सेवा करू इच्छिते, असे या वेळी भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड होण्याची आशा असलेल्या नम्रताने सांगितले.