चार महिन्याच्या बाळाची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका भारतीय महिलेला आबूधाबी फाशीची शिक्षा दिली असल्याची माहिती सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील ही महिला होती. तिला अबूधाबीमध्ये फाशी देण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
परराष्ट्रमंत्र्यांनी न्यायालयाला सांगितले की, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी यूएईच्या कायदे आणि नियमांनुसार शहजादी खानला फाशी देण्यात आली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) चेतन शर्मा म्हणाले की, यूएईमधील भारतीय दूतावासाला २८ फेब्रुवारी रोजी सरकारकडून खानच्या फाशीबद्दल अधिकृत संदेश देण्यात आला. “अधिकारी सर्वतोपरी मदत करत आहेत आणि तिच्या पार्थिवावर ५ मार्च २०२५ रोजी अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन आहे”, असेही त्यांनी सांगितले.
खानचे वडील शब्बीर खान यांनी त्यांच्या मुलीच्या सध्याच्या कायदेशीर स्थिती आणि कल्याणाबाबत माहिती मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे घडले. मंत्रालयाच्या युक्तिवादानंतर, न्यायालयाने ही “दुःखद आणि दुर्दैवी” घटना असल्याचे म्हणत याचिका निकाली काढली.
#UPDATE | The Centre (MEA) informed the Delhi High Court that Shahzadi Khan, the woman from Uttar Pradesh, had been executed on the 15th of February. The ASG Chetan Sharma also stated that the authorities are extending all possible assistance and that her cremation is scheduled… https://t.co/ZAZIdfsm9Y
— ANI (@ANI) March 3, 2025
नेमकं काय घडलं होतं?
शहजादी ही उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. व्हिसा मिळाल्यानंतर शहजादी खान डिसेंबर २०२१ मध्ये अबू धाबीला गेली होती. ती तिथे एका गृहकामासाठी तिथे गेली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये ती ज्या मालकांकडे राहत होती, त्या दाम्प्त्याने एका मुलाला जन्म दिला. या मुलाच्या देखभालीची जबाबदारी शहजादी खानवर येऊन पडली. त्या बाळाला नियमित लसीकरण केले जात होते. त्यानुसार, नियमित लसीकरणानंतर ७ डिसेंबर २०२२ रोजी या बाळाचं निधन झालं. दरम्यान, हे प्ररकण कोर्टात गेलं. शहजादी खानने बाळाच्या हत्येची कबुली दिल्याचं एक व्हिडिओही रेकॉर्ड करण्यात आला आहे. या रेकॉर्डनुसार तिच्यावर गुन्हा दाखल होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तिच्या मालकांनी तिचा छळ करून तिच्याकडून कबुलीजबाब मिळवल्याचा दावा शहजादी खानच्या वडिलांनी केला आहे. यासाठीच ते दिल्ली हायकोर्टात गेले होते. परंतु, तिथे त्यांची याचिका निकाली काढण्यात आली.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही केली होती विनंती
शहजादी या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर तिच्या वडिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाने अनेक याचिका दाखल करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. तसंच, त्यांनी राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवून विनंती केली होती.
फेसबुकवरील मैत्रीच्या ओळखीने गेली दुबईला
तिच्या वडिलांनी सांगितलं की, शहजादीला लहानपणापासून चेहऱ्यावरील जळजळीचा त्रास होता. त्यानंतर ती रोटी बँक बांदा संस्थेत ती कामाला लागली. फेसबुकवर तिची उझेर नावाच्या एका व्यक्तीबरोबर मैत्री झाली. त्यानेच तिला नोव्हेंबर २०२१ मध्ये दुबईला वैद्यकीय उपचारांसाठी जाण्यासाठी मदत केली. उझेरचे नातेवाईक, त्याचे काका फैज, काकी नाझिया, नाझियाची सासू अंजूम सहाना बेगम हे दुबईला राहतात.
कालांतराने नाझियाने एका बाळाला जन्म दिला. तो चार महिन्यांनी मृत पावला. त्यामुळे या बाळाच्या मृत्यूप्रकरणी शाहजादीला अटक करण्यात आली. शाहजादीच्या वडिलांनी १५ जुलै २०२४ रोजी मातौंध पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तिच्या मुलीला दुबईला विकण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु, उपनिरीक्षक मोहम्मद अक्रम यांनी याप्रकरणात चौकशी केली नाही, असा आरोपही तिच्या वडिलांनी केला आहे.