Gangrape in Hyderabad : हैदराबादमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. मंदिर परिसराच्या जवळच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी संध्याकाळी पीडित महिला तिच्या एका नातेवाईकासोबत तेलंगणाच्या नागरकुर्नूल जिल्ह्यातील उरकोंडापेटा गावातील मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन झाल्यानंतर दोघेही मंदिराच्या परिसरात काही वेळ थांबले. यादरम्यान महिला नैसर्गिक विधीसाठी गेली असता तिथून आरोपी टोळक्यानं महिलेला निर्जन स्थळी नेलं. तिथे महिलेवर रात्री या टोळक्यानं सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडित महिलेच्या नातेवाईकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता या टोळक्यानं त्याला एका झाडाला बांधून ठेवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला व एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं. त्यात एक इलेक्ट्रिशियन, एक रिक्षाचालक व दोन आचाऱ्यांचाही समावेश आहे. या चौघांवर याआधीही खंडणीखोरीचे गुन्हे दाखल आहेत.
राज्य महिला आयोगाने घेतली दखल
दरम्यान, नागरकुर्नूल जिल्हा व हैदराबादमध्येदेखील गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना गांभीर्याने लक्ष घालण्याचे निर्देश आयोगाने घेतले आहेत. तसेच, बलात्काराच्या प्रकरणातील पीडित महिलांच्या आरोग्याची आयोगाकडून विशेष दखल घेतली जात आहे. पीडितांना योग्य ते उपचार मिळावेत व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा सूचना आयोगाने पोलीस विभागाला दिल्या आहेत.