पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे.

सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. याशिवाय रहमत अली आणि महबूल असे दोन आरोपी आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिला आपल्या घऱी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. “नुकतंच महिलेला मेंदूघाताचा झटका आला होता. यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या दिवशी कुटुंबाने महिलेला उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयात नेलं. दरम्यान या घटनेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. टीएमसी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

“पोलिसांनी सुरुवातीला महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टीएमसी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे,” असा आरोप भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालविया यांनी केला आहे.

“सोमवारी संध्याकाळपर्यंत वैद्यकीय तपासणी झाली नव्हती. महिला लेखी स्वरुपात बलात्कार झाल्याचं सांगत असतानाही डॉक्टल वैद्यकीय तपासणी करण्यास तयार नसलेल्या राज्यात काय स्थिती असेल याचा विचार करा. नंतर त्यांनी केली पण दबावापोटी बलात्काराच्या जखमा नसल्याचं सांगत होते,” असा आरोप भाजपा आमदार अग्निमित्र पॉल यांनी केला आहे.

दुसरीकडे टीएमसीने आपण पीडित कुटुंबासोबत असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी असं म्हटलं आहे. गुन्हेगारांना कोणताही धर्म, जात नसते असं टीएमसीचे हावडा जिल्हाध्यक्ष पुलक रॉय म्हणाले आहेत.

Story img Loader