हैदराबादमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. लग्नाला नकार दिल्यानंतर एका व्यावसायिक महिलेनं टीव्ही अँकर असलेल्या मुलाचा पाठलाग केला आणि त्याचे अपहरण केलं. टीव्ही अँकर असलेला मुलगा कुठे जातो, हे तपासण्यासाठी महिलेने त्याच्या वाहनाला ट्रॅकिंग उपकरण लावल्याचीही माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर माझे फोन कॉल उचलावे लागतील, असे मुलाकडून कबूल करून घेतल्यानंतरच त्याची सुटका केली. या गुन्ह्यासाठी पोलिसांनी आता सदर व्यावसायिक महिलेला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे.
प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने लग्नासाठी मॅट्रिमोनिअल साइटवर नोंदणी केली होती. तिथे एका मुलाचा प्रोफाईल तिला आवडलं. दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. मात्र कालांतराने महिलेला संबंधित मुलाचे सत्य समजले. त्याने स्वतःच्या फोटोऐवजी एका टीव्ही अँकर मुलाचा फोटो प्रोफाईलला जोडला होता. त्या फोटोला पाहून महिलेची दिशाभूल झाली.
अल्पवयीन विवाहित मुलीची आत्महत्या; अंत्यविधी परस्पर उरकला; दोन महिन्यांनी गुन्हा दाखल
फोटो पाहून प्रेमात पडलेल्या महिलेने यानंतर संबंधित टीव्ही अँकरचा शोध घेतला आणि त्याचा नंबर मिळवला. सदर मुलाला संपर्क साधल्यानंतर महिलेनं त्याला त्याच्या फोटोचा गैरवापर झाल्याची माहिती दिली. तसेच त्याने सायबर क्राइम पोलिसांना याबाबत तक्रार द्यावी, असेही सांगितले. या मुद्द्याने दोघांचे संभाषण सुरू झाले. त्यानंतर महिलेने मुलाला मेसेज पाठविणे सुरूच ठेवले. त्यामुळे काही दिवसांनी मुलाने महिलेचा नंबर ब्लॉक केला.
फोटो पाहून टीव्ही अँकरशी लग्न करण्याचा निश्चय केलेल्या महिलेने त्याचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी चार लोकांना पैसे देऊन हे कृत्य तडीस न्यायला सांगितले. ११ फेब्रुवारी रोजी चार गुंडांनी पीडित टीव्ही अँकरचे अपहरण केले आणि त्याला सदर महिलेच्या कार्यालयात आणून मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जीव वाचविण्यासाठी पीडित मुलाने महिलेची मागणी मान्य केली, यापुढे तो तिच्या कॉलला प्रतिसाद देईल, असेही सांगितले. तेव्हाच त्याला कार्यालयातून जाण्याची परवानगी दिली.
आसाम सरकारने ‘मुस्लीम विवाह कायदा’ रद्द केला; समान नागरी कायद्याच्या दिशेने पहिले पाऊल
कार्यालयातून कशीबशी सोडवणूक करून घेतल्यानंतर पीडित मुलाने हैदराबादच्या उप्पल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३६३ (अपहरण), ३४१ आणि ३४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिला आणि चार गुंडांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास अद्याप सुरू आहे.