कुठल्याही महिलेची ओळख ही तिच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून नाही. सौभाग्यवती महिलेला मंदिर प्रवेश द्यायचा आणि विधवा महिलेला मंदिर प्रवेश नाकारायचा हे मुळीच योग्य नाही. विधवेला मंदिर प्रवेश नाकारण्याच्या प्रयत्नावरही कारवाई केली गेली पाहिजे असं कठोर मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केलं आहे. विधवा महिलांना मंदिर प्रवेश नाकारण्याच्या प्रथेवर मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. कायद्याचं राज्य ज्या सभ्य समाजाता आहे त्या ठिकाणी या अशा प्रथांचं काय काम? असंही कोर्टाने म्हटलं आहे
मद्रास उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे?
“आपल्या राज्यात (तामिळनाडू) अजूनही विधवा महिलांना मंदिरात प्रवेश केला तर मंदिर अपवित्र होतं असल्या प्रथा आहेत. समाज सुधारक या मूर्खासारख्या प्रथा मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हा दुराग्रह आहे. पुरुषांनी या प्रथा हे नियम आपल्या सुविधेनुसार तयार केले आहेत. वास्तवात हा महिलेचा अपमान आहे.”
या संदर्भात जस्टिस आनंद व्यंकटेश यांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक महिलेला तिची अशी एक स्वतःची ओळख असते. ती ओळख ही तिची स्वतःची ओळखच असली पाहिजे. तिची वैवाहिक स्थिती काय आहे? ती सौभाग्यवती आहे की विधवा आहे यामुळे तिची ओळख पुसली जाऊ शकत नाही किंवा तिचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही.
कायद्याचं राज्य ज्या ठिकाणी आहे त्या राज्यात अशा प्रथा असणं दुर्दैवी आहे. मंदिरात प्रवेश करण्यापासून एखाद्या विधवा महिलेला रोखण्याचा प्रयत्न करणं यावरही कारवाई केली गेली पाहिजे. थंगमणि यांच्या याचिकेवर सुनावणी करत असताना हे मत न्यायालयाने नोंदवलं आहे. थंगमणी या महिलेने असं म्हटलं आहे की पेरियाकरुपरायण मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि ९ आणि १० ऑगस्टला होणाऱ्या मंदिरातल्या उत्सवासाठी आपल्याला सुरक्षा पुरवली जावी. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने आपलं परखड मत नोंदवलं आहे. Livelaw ने हे वृत्त दिलं आहे.
काय म्हटलं आहे याचिका करणाऱ्या थंगमणी या महिलेने?
थंगमणी यांनी हे सांगितलं की माझे पती आणि या मंदिराचे पुजारी यांचा २८ ऑगस्ट २०१७ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर मी जेव्हा माझ्या मुलासह मंदिरात जाण्याचा आणि उत्सवात सहभागी होण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही जणांनी मला धमक्या दिल्या. तसचं मंदिरात मला प्रवेश नाकारला कारण मी विधवा आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने हे परखड मत नोंदवलं आहे. तसंच थंगमणी आणि त्यांच्या मुलाला मंदिरात प्रवेश करण्यापासून आणि उत्सवात सहभागी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असंही स्पष्ट केलं आहे.