आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साई यांचा शोध घेण्याची मोहीम यापुढेही सुरू ठेवली तर ठार करण्याची धमकी येथील एका वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्यास देण्यात आली आहे. सुरत येथील दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापू व त्यांचे पुत्र नारायण साई यांच्यावर आहे. येथील उमराह पोलिस स्टेशन येथे याबाबत प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त शोभा भुताडे येथील चौकशीवर देखरेख करीत असून साई यांच्यावर जहांगीरपुरा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी पोलिस अधिकारी शोभा भुताडे यांना साई यांची चौकशी व शोध थांबवावा अन्यथा तुम्हालाच ठार केले जाईल, अशी धमकी देणारा फोन आला होता, अशी माहिती उमराह येथील पोलिस निरीक्षक सी.के.पटेल यांनी दिली. फोनकर्त्यांने श्रीमती भुताडे यांना, साई यांचा शोध थांबवा अन्यथा तुम्हाला गोळ्या घालू अशा शब्दात धमकी दिल्याचे पटेल म्हणाले.
मध्यप्रदेशातील जसरत सिंग याच्या नंबरवरून हा फोन करण्यात आला असावा, असे पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, याबाबत चौकशी सुरू असून या फोनमागील हेतू प्रत्यक्ष चौकशीअंती स्पष्ट होईल असे सांगून ते म्हणाले की, फोन करणाऱ्याने स्वत:चे सिमकार्ड वापरले नसावे असे दिसते किंवा दुसऱ्याच्याच फोनवरून कॉल केला असावा. साई हा आसारामबापूंचा मुलगा सुरतमध्ये २००२ ते २००५ या काळामध्ये दोन बहिणींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी असून सुरत आश्रमात दोन बहिणींपैकी मोठय़ा बहिणीवर त्याने अत्याचार केले होते.

Story img Loader