woman killed her 3 children to marry ex-classmate Crime News : हैदराबादच्या अमीनपूर येथे काही दिवसांपूर्वी तीन मुले त्यांच्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते, यानंतर आता या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी बुधवारी आईनेच या तीन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचा दावा केला आहे.

सांगारेड्डीचे पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी राजिता (३०) नावाची महिला आणि तिचा माजी वर्गमित्र सुरु शिवकुमार (३०) यांना मुलांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. तसेच या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

राजिथा आणि चेन्नाईहा यांच्या अमीनपूरमधील राघवेंद्र नगर येथे असलेल्या घरातून २८ मार्च रोजी १२, १० आणि ८ वर्षांच्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी या तीनही मुलांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिताचे लग्न चेन्नाइह (५०) याच्याबरोबर २०१३ साली झाले होते. मात्र लग्नाबाबत रजिता ही खूष नव्हती आणि दोघांमध्ये कायम वाद होत असत. यादरम्यान १०वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्याच्या निमित्ताने सहा महिन्यांपूर्वी रजिता ही शिवा याच्या संपर्कात आली. यानंतर दोघांमध्ये नाते निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करून एकत्र आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी सांगितले की, शिवाने रजिताला तिच्या मुलांना सोडून देण्यास सांगितलं आणि त्यानंतर तिने नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मुलांच्या हत्येची योजना आखली. २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजती तिने हा निर्णय शिवाला सांगितला.

पंकज यांनी सांगितलं की शिवाने या योजनेला पाठिंबा दिला. “एक एक करून तिने मुलांचा गळा दाबून ठार केली. तिने टॉवेल वापरून एकापाठोपाठ एकाचा गळा आवळला”, असेही पोलीस अधीक्षक म्हणाले.

पाण्याचा टँकर चालवणारा चेन्नाइह जेव्हा रात्री उशिरा घरी आला तेव्हा रजिताने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. रात्रीच्या जेवणात दही भात खाल्ल्यानंतर मुले बेशुद्ध पडल्याचेही तिने त्याला सांगितले. तिने वेदना होत असल्याचे नाटक केल्यामुळे, चेन्नाइया आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या चौघांनाही रुग्णालयात नेले, असे पोलिसांनी सांगितले.