Crime News : राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील जाहिरा गावात एक अत्यंत धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. या घटनेत एका महिलेच्या पायातील चांदीचे दागिने चोरण्यासाठी तिचा गळा चिरून तिचे दोन्ही पाय तोडल्याचा प्रकार घडला आहे. तिच्या पायातील पैंजण काढून घेतल्यानंतर आरोपींनी तोडलेले पाय त्यांनी पाण्याच्या टाकीत फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हत्या झालेल्या महिलेचे नाव उर्मिला मीना (वय ५० वर्ष) असे असून त्यांचा मृतदेह रविवारी शेतात आढळून आले. ही महिला लाकूड तोडण्याच्या उद्देशाने सकाळी शेतात गेली होती, पण अकरा वाजून गेले तरी ती परतली नाही अखेर तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला.
शोध घेतल्यानंतर उर्मिला यांचा मृतदेह शेतात आढळला, त्यांचा गळा चिरलेला होता आणि पाय गायब होते. नंतर कापलेले पाय जवळच्या पाण्याच्या टाकीत सापडले आणि तिच्या पायातून सुमारे दोन किलो वजनाचे जड चांदीचे पैंजण गायब होते.
ग्रामस्थांचा संताप
उर्मिला यांची हत्या पायातील चांदीच्या दागिन्यांसाठी करण्यात आल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आहे, यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर त्यांनी बामनवास पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना देखील हा क्रूर प्रकार पाहूण धक्का बसला. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उर्मिला यांचा मृतदेह ठेवत रास्ता रोको केला.
पोलिस उपअधीक्षक आणि बामनवास पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुनही गावकरी त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. रविवारी दुपारपासून ते उर्मिला यांच्या मृतदेह घेऊन धरणे आंदोलन करत आहेत. हत्या करणाऱ्यांना अटक होईपर्यंत जागेवरून न हलण्याचा निर्धार गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे अद्याप मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नाही . तसेच गावकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. पोलिस आरोपींटा शोध घेत आहेत, मात्र अद्याप त्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही.