आईच्या नात्याला काळिमा फासेल अशी घटना समोर आली आहे. नवऱ्याची किडनी निकामी झाल्याने नवजात बाळाची हत्या करण्यात आली आहे. तिने तिच्या अवघ्या १३ दिवसांच्या चिमुकलीला पाण्याच्या बादलीत बुडवून मारलं. हा प्रकार पतीच्या लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपी आरोग्या विज्जी (३०) हिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूमध्ये हा प्रकार घडला आहे.

आरोग्या विज्जी हिचा पती मुदलाई मणी याची किडनी निकामी झाल्याने तो डायलिसिसवर आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याने विज्जीला तिच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत होती. त्यामुळे तिने नुकत्याच जन्माला आलेल्या १३ दिवसांच्या बाळाची हत्या केली.

२५ मार्च रोजी मणी कामाला गेल्यानंतर तिने त्याला तत्काळ फोन करून बोलावून घेतले. मी अंघोळीला गेले होते. अंघोळी करून बाहेर आल्यावर बाळाला कोणीतरी पाण्याने भरलेल्या बादलीत टाकले होते, असं तिने पतीला सांगितलं. हे ऐकताच तिचा पती धावत घरी आला आणि त्याने बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पण, तिचा त्याआधीच मृत्यू झाला होता.

पोस्टमार्टम आणि इतर पुराव्यांमुळे लागला हत्येचा छडा

याप्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोस्टमार्टम आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी बाळाच्या आईला म्हणजेच विज्जीला पोलीस चौकशीसाठी बोलावले. पोलिसांच्या चौकशीत तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

मूळचे तामिळनाडूचे रहिवासी असलेले हे जोडपे कामासाठी शहरात स्थलांतरित झाले होते आणि ते मैलारदेवपल्ली येथील काटेदान येथे राहत होते. ते काटेदान औद्योगिक क्षेत्रातील एका लघु उद्योगात काम करत होते. तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची पुष्टी मैलारदेवपल्ली पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने केली.