काही जणांसाठी सोशल मीडिया हे एखाद्या व्यसनाप्रमाणे आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या व्यावसायिक आणि वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होतात. आंध्र प्रदेशात विजयवाडामध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. एक लोकप्रिय सोशल मीडिया अॅप दोघांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पत्नी सतत टिक-टॉकवर वेळ घालवायची. त्यामुळे एक दिवस पतीने तिला सुनावले. नवऱ्याचे बोलणे मनाला लागल्यामुळे या महिलेने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. आई सोडून गेल्याचा विरह सहन न झाल्यामुळे नंतर मुलाने सुद्धा आत्महत्या केली. दोघांनी सायनाइड प्राशन करुन जीवन संपवले. महिलेच्या पतीचा सोने पॉलिश करण्याचा व्यवसाय होता.
करोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरु असल्याने त्याची नोकरी गेली होती. पत्नीला टिक-टॉक व्हिडीओचे व्यसन लागले होते. ती सतत त्यामध्येच बिझी असायची. दोन महिन्यापूर्वी या कुटुंबाचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये चार ते पाच लाख रुपये खर्च झाले होते. वैद्यकीय खर्चासाठी कुटुंबाने कर्ज काढले होते. ल़ॉकडाउनमध्ये पतीची नोकरी गेली. तो घरातील कर्ता पुरुष होता अशी माहिती टाऊन पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
पत्नी सतत टिक-टॉकवर व्हिडीओ बनवायची. तिच्या या सवयीला कंटाळलेल्या नवऱ्याने तिला यावरुन सुनावले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने सायनाइड प्राशन केले. सोने पॉलिश करण्यासाठी सायनाइडची बाटली घरी आणली होती. आईला मृतावस्थेत पाहिल्यानंतर मुलाने सुद्धा त्याच बाटलीतील सायनाइड प्राशन केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.