Woman Molested In Ambulance in UP : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली. रुग्णालयातून आपल्या पतीला रुग्णवाहिकेतून घरी जाताना एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. एवढंच नव्हे तर या दोघांनाही नंतर रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आलं. या प्रकारामुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
पीडित महिलेचा पती हरीश काही दिवसांपासून आजारी होता. पीडितेने पतीला जवळच्या बस्ती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. परंतु, त्याची प्रकृती खालावल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. परंतु, खासगी रुग्णालय परवडत नसल्याने तिने पतीला घरी नेण्याचा निर्णय घेतला.
पतीचा ऑक्सिजन काढून घेतला अन्…
रुग्णालयातून घरी जाताना रुग्णावाहिका चालकाने तिला बळजबरीने रुग्णवाहिकेत बसवले. तर रुग्णवाहिका कर्मचाऱ्याने तिचा लैंगिक छळ केला. याविरोधात तिने आरडाोरडा केला. तेव्हा तिच्या पतीचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला. तसंच, पतीसह तिली रुग्णावाहिकेतून बाहेर फेकण्यात आले.
पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले परंतु…
रुग्णवाहिका चालकाने तिचे दागिनेही चोरल्याचा आरोप तिने केला. ऑक्सिजनचा पुरवठा काढून रुग्णावाहिकेबाहेर फेकल्याने तिचा पती गंभीर जखमी झाला होता. पीडितेने आपल्या भावाला फोनवर ही सर्व हकिगत सांगितली. त्याने तत्काळ याविरोधात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला.
रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यासाठी पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. याप्रकरणी तिने लखनऊच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. लखनौ उत्तरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्र दुबे यांनी सांगितले की, सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका महिलेने लखनौच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या कथित मारहाणीबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.