कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये रविवारी (५ नोव्हेंबर) एका वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्याची हत्या झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने राहत्या घरात त्यांची गळा चिरून हत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी या हत्येचं गूढ उलगडलं आहे. बंगळुरू पोलिसांनी सोमवारी संशयित आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, केएस प्रतिमा असं हत्या झालेल्या वरिष्ठ महिला सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे. तर अटक केलेल्या आरोपीचं नाव किरण आहे. प्रतिमा या कर्नाटकच्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागातील उपसंचालक पदावर कार्यरत होत्या आणि आरोपी किरण हा याच विभागात कंत्राटी चालक म्हणून काम करत होता. ७ ते १० दिवसांपूर्वी प्रतिमा यांनी आरोपी किरणला सेवेतून बडतर्फ केले होते. हाच राग मनात धरून आरोपीनं प्रतिमा यांची राहत्या घरात निर्घृण हत्या केली.
या घटनेनंतर आरोपी किरण हा कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात पळून गेला होता. गुप्त माहितीच्या आधारे त्याला सोमवारी अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा- सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेचा चाकू भोसकून खून, घटनेनं एकच खळबळ
अटकेबाबत अधिक माहिती देताना बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले, “प्रतिमा हत्याकांडप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईचे नेतृत्व डीसीपी दक्षिण (बंगळुरू) यांनी केले आणि आरोपीला माले महाडेश्वरा हिल्सजवळून ताब्यात घेतलं आहे. आरोपी हा चालक म्हणून काम करत होता आणि त्याला ७ ते १० दिवसांपूर्वी प्रतिमा यांनी कामावरून काढून टाकलं होतं.