अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले. तेथे त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.
हा आपल्यासाठी मोठा सन्मान असून या आदरातिथ्याबद्दल आपण आभारी आहोत, असे ओबामा यांनी सांगितले.
ओबामा यांना विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने मानवंदना दिली. मुखर्जी यांनी ओबामांची ओळख मंत्री व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी करून दिली. या वेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू, ऊर्जामंत्री पीयूष गोयल व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग उपस्थित होते.
मिशेल यांना बनारसी साडी
बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना आताच्या भारत दौऱ्यात येथील विणकरांनी तीन महिने परिश्रम करून हाताने विणलेली बनारसी रेशमी साडी नजराणा म्हणून दिली जाणार आहे, या साडीला ‘कधुआ साडी’ असे म्हटले जाते. हाताने विणलेल्या साडीत सोन्याचे व चांदीचे धागे विणलेले असतात. साडीचे वजन ४०० ग्रॅम असून किंमत दीड लाख रुपये आहे.
अब्दुल मटिन यांचे कुटुंब तीन पिढय़ा साडय़ा विणण्याचा व्यवसाय करते आहे. मिशेल यांचे बनारसी साडीचे आकर्षण आम्हाला माहीत आहे, असे सांगून मटिन म्हणाले की, भारतीय वंशाचे अमेरिकी फ्रँक इस्लाम या ओबामा यांच्या विश्वासू व्यक्तीने या साडीची मागणी नोंदवली होती. इस्लाम हे आझमगड येथे जन्मलेले असून त्यांना अलीकडेच मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर हा पुरस्कार मिळाला होता. ते भारतात आलेल्या अमेरिकी शिष्टमंडळात आहेत.
कधुआ रेशमी साडी ही फार दुर्मीळ असते व हाताने विणण्यास तीन-चार महिने लागतात. वाराणसीच्या रेशमी साडी विणकरांची संघटना असलेल्या वाराणसी वस्त्र उद्योग संघाने नवी दिल्लीला १०० साडय़ा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार यांच्याकडे पाठवल्या असून त्याही मिशेल ओबामा यांना दिल्या जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा