नवी दिल्लीत एका महिला पायलटला आणि तिच्या पतीला जमावाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय एका महिला पायलट आणि तिच्या पतीचं काही लोकांशी भांडण सुरू आहे. या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. ज्यात जमावाने महिला पायलट आणि तिच्या पतीला मारहाण केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, महिला पायलट आणि तिच्या पतीने त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या मुलीला जबर मारहाण केल्यामुळे जमाव संतापला होता.
गेल्या दोन महिन्यांपासून एक अल्पवयीन मुलगी या दाम्पत्याच्या घरात घरकाम करत आहे. तिला या दाम्पत्याने मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या महिला पायलटचा पती एअरलाईन्समध्ये ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केल्यामुळे तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी तिला या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी कथित आरोपी महिला पायलट आणि तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच तिथे जमलेल्या लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला मारहाण करायला सुरुवात केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक लोक महिला पायलट आणि तिच्या पतीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच या दाम्पत्याने मुलीबरोबर जे केलं ते चुकीचं असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी महिला पायलट आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दाम्पत्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी जमावातील लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी पोलीस या मारहाणीचे व्हिडीओ तपासत आहेत.