रेल्वेने भोपाळहून भिलवाडाला आपल्या दोन लहान मुलांसह निघालेल्या एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अजमेर स्थानकावर ही महिला मुलांसाठी खाऊ घ्यायला खाली उतरली होती, तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला.

आरोपीची रवी उर्फ सनी (वय-२३), अशी ओळख झाली आहे, त्याने पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून तिचे कपडे स्वत:च्या ताब्यात ठेवले होते. एका मोडकळीस आलेल्या घरात या महिलेवर त्याने बलात्कार केला. भगवान गंजचा रहिवासी असलेल्या रवीला गुरुवारी अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अजमेरमधील जीआरपीचे एसएचओ फूल चंद बटोलिया यांनी सांगितले की, भोपाळची रहिवासी असणारी पीडित महिला २७ सप्टेंबर रोजी टॉवेल गुंडाळून पोलीस स्टेशनमध्ये आली होती. एका पुरुषाने बलात्कार केल्याचे तिने सांगितले. याशिवाय आरोपीने तिच्या चार वर्षांच्या मुलीला बंदिस्त करून ठेवल्याचेही तिने तक्रारीत म्हटले.

याशिवाय पीडितेने पोलिसांना सांगितले की, रवीने तिचा पाठलाग सुरू केला आणि तिला एक रात्र राहण्यासाठी स्वस्त हॉटेल शोधून देण्याचे आश्वासन दिले. त्याने तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला रेल्वे स्टेशनवर थांबण्यास भाग पाडले आणि तिला आणि तिच्या चार वर्षांच्या मुलीला कुंदन नगर येथील एका पडक्या घरात नेले व तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिने हिंमतीने स्वत:ची सुटका करून तिथून पळ काढला आणि एक टॉवेल गुंडाळून ती तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. आम्ही आरोपीला अटक केली आहे व पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader