Woman sentenced to death for killing daughter in ritual sacrifice : एका गृहिणी महिलेला तिच्या सात वर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी तेलंगणाच्या सूर्यापेट येथील स्थानिक कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. २०२१ मध्ये या महिलेने स्वत:वरील सर्प दोष (sarpa dosham) घालवण्यासाठी मुलीचा बळी दिल्याचा धक्कादायकर प्रकार समोर आला होता. य

दरम्यान बी भारती उर्फ लास्या ही दोन वर्षांनंतर तिच्या पतीची दगडाने हत्या करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी सध्या तुरूंगात आहे. सूर्यापेटमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेत या प्रकरणाची देखील महत्त्वाची भूमिका राहिली आहे. “सर्व पुराव्यांच्या आधारे कोर्टाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा निष्कर्ष काढला आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली,” असे कोडडचे डीएसपी श्रीधर रेड्डी म्हणाले.

नेमकं काय झालं?

भारतीने १५ एप्रिल २०२१ रोजी सूर्यापेट जिल्ह्यातील मोथे (Mothey) मंडळातील मेकालपती (Mekalapati) तांडा येथे त्यांच्या राहत्या घरात झोपायच्या खोलीत विशेष पूजा केली होती, ज्यामध्ये तिने स्वत:ला आणि तिच्या मुलीला कुंकू आणि हळद लावून घेतली होती. “या पुजेदरम्यान माझ्या पत्नीने आमच्या मुलीची तिचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तीने मृतदेहाची जीभ देखील कापली,” असे भारतीचा पती बी कृष्णा याने मोथे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.

कृष्णा याने सांगितलं की, त्यावेळी त्याचे आजारी वडील हेच कुटुंबातील एकमेव सदस्य घरात होते. त्यांनी मूल रडताना ऐकले आणि त्यांना संशय आला. काठीचा आधार घेऊन ते बिछान्यातून उठले आणि त्यांनी भारतीला रक्ताने माखलेल्या कपड्यांसह बाहेर जाताना पाहीलं. आपण आपलं बाळ देवाला बळी दिलं असून सर्प दोषापासून मुक्ती मिळवली असल्याचं सांगत ती घरातून निघून गेली .

कृष्णाच्या वडीलांनी कळवल्यानंतर शेजारी आणि नातेवाईक तात्काळ घरी पोहचले आणि त्यांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जेथे तिला मृत घोषित करण्यात आले. मोथे (Mothey) पोलिसांनी घराजवळूनच आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

सुनावणीदरम्यान १० साक्षिदारांची उलटतपासणी घेण्यात आली, ज्यामध्ये पडीत मुलीचे चुलते आणि फॉरेन्सीक एक्सपर्ट्स यांचा समावेश होता ज्यांनी पहिल्यांदा मृतदेह पाहिला होता, असे मोथे एसआय यादवेंद्र रेड्डी यांनी सांगितले.

दोन वर्षांनी पतीच्या हत्येचा प्रयत्न

भारतीला २०२१ मध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर भारतीला जामीनावर सोडण्यात आले आणि ती तिच्या पतीबरोबर राहू लागली. “२०२३ मध्ये कृष्णा झोपेत असताना भारतीने त्याच्या डोक्यावर एक किलो वजनाच्या दगडाने हल्ला केला. त्याच्या तक्रारीनंतर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि तिला पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणात ९ एप्रिल रोजी सूर्यापेट येथील स्थानिक न्यायालयाने तिला दोषी ठरवले आणि एक वर्षाची शिक्षा सुनावली,” असे एसआय रेड्डी यांनी सांगितले.

पतिचा धक्कादायक खुलासा

भारती आणि कृष्णा हे दोघे शाळेत वर्गमित्र होते आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. “पोलिओमुळे माझा उजवा पायावर परिणाम झालेला आहे. मला भारतीशी लग्न करायचे होते पण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या कुटुंबियांनी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली. भारतीने २००८ मध्ये त्याच्याशी लग्न केले पण नंतर वैयक्तिक कारणांमुले घटस्फोट घेतला. नंतर मी २०१९ मध्ये तिच्याशी लग्न केले,” असे कृष्णाने आपल्या जबाबात म्हटले आहे.

कृष्णाच्या मते भारती ही तिच्या वैवाहिक अडचणींमुळे मानसिक आजाराने गृस्त आहे. “आमच्या लग्नाच्या काही वर्ष आधी एक ज्योतिष्याने तिला सांगितले होते की तिला सर्प दोषाची बाधा आहे. तिला सर्प दोषाच्या विधींचे वेड लागले होते आणि ती तिच्या मोबाईलवर सारखी त्याबद्दलचे व्हिडीओ पाहात असे,” असे कृष्णा म्हणाला.

हत्या होण्याच्या काही महिन्यांपूर्वी कुटुंबाने खम्मममधील एका मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला देखील घेतला होता. त्याने भारतीला औषध लिहून दिले, जे तिने कधीही घेतले नाही, असे कृष्णाचे म्हणणे आहे. दरम्यान आरोपी सध्या हैदराबादमधील चंचलगुडा महिला मध्यवर्ती कारागृहात आहे.