Delhi Crime : खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या महिलेचं दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला व्हेटिंलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं अशी तक्रार तिने केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात खासगी विमान कंपनीत काम करणारी एक महिला दाखल झाली होती. तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. या महिन्याच्या सुरुवातीलाच ती मेदांता रुग्णालयात दाखल झाली होती. ६ एप्रिलला ही घटना घडल्याचा आरोप या महिलेने केला असून तिला रुग्णालयातून १३ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

गुडगावमध्ये महिला आल्यानंतर काय घडलं?

खासगी विमान कंपनीत काम करणारी महिला गुडगाव या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आली होती. त्यावेळी ती एका हॉटेलमध्ये वास्तव्य करत होती. स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना तिला वाटलं की आपण बुडू. तिला श्वास घेणंही कठीण झालं होतं. ज्यानंतर या महिलेला गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या पतीनेच तिला या रुग्णालयात आणलं. यानंतर ६ एप्रिल रोजी लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

महिलेचा नेमका आरोप काय?

या महिलेने तक्रारीत सांगितल्याप्रमाणे, ६ एप्रिलला मेदांता रुग्णालयात तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी रुग्णालयातला एक कर्मचारी आला आणि त्याने तिचं लैंगिक शोषण केलं. मी त्यावेळी बोलू शकले नाही किंवा बचावासाठी आरडाओरडाही करु शकले नाही कारण मी अर्धवट शुद्धीत होते, तसंच स्विमिंग पूलमध्ये आपण बुडालो असतो तर? या विचारांनी मी घाबरुनही गेले होते. माझ्या अशा अवस्थेत माझं शोषण करण्यात आलं. त्यावेळी दोन परिचारिकाही उपस्थित होत्या असाही आरोप पीडित महिलेने केला आहे. या महिलेला १३ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. ज्यानंतर सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी नोंदवून घेतला पीडितेचा जबाब

पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा जबाब मॅजिस्ट्रेट समोर नोंदवून घेतला आहे. मेदांता रुग्णालयात जाऊन पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसंच आरोपी नेमका कोण होता? त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात आम्ही योग्य दिशेने तपास सुरु केला आहे. लवकरच त्या आरोपीला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.