उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात असताना रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसंच जिवंत जाळलं आणि पळ काढला. पीडित महिला ८० टक्के भाजली असून उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पीडितेने ज्या पाच जणांची नावं सांगितली होती त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी अद्याप फरार आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत अशी माहिती उन्नावचे पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी दिली आहे.

पीडितेने रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला असून, आपण पहाटे ४.३० वाजता बैसवारा बिहार रेल्वे स्थानकावर जात होतो. यावेळी हरीशंकर त्रिवेदी, किशोर, शुभम, शिवम, उमेश यांनी आपला रस्ता अडवला अशी माहिती दिली आहे. पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार, मार्च २०१९ रोजी आपल्यावर आरोपींकडून बलात्कार करण्यात आला होता. यानंतर आपण एफआयआरही दाखल केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman set on afire gangraped unnao uttar pradesh sgy