होणाऱ्या पतीसह फिरायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा पोलीस कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पीडितेच्या होणाऱ्या पतीला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. तसेच जोडप्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. यावेळी जोडप्याने पोलिसांच्या पाया पडत सोडून देण्याची विनंती केली. पण पोलिसांनी दोघांना तब्बल तीन तास डांबून ठेवलं आणि पीडितेचा लैंगिक छळ केला.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, १६ सप्टेंबर रोजी पीडित तरुणी आपल्या होणाऱ्या पतीसह गाझियाबाद येथील साई उपवन जंगलात फिरायला गेली होती. यावेळी आरोपी पोलीस कर्मचारी राकेश कुमार आणि दिगंबर कुमार यांच्यासह अन्य एका अज्ञात व्यक्तीने या दोघांना दमदाटी केली. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या होणाऱ्या पतीला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तसेच जोडप्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. शेवटी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडितेच्या होणाऱ्या पतीला पेटीएमद्वारे एक हजार रुपये भरण्यास भाग पाडलं.
हेही वाचा- मुंबईत आईला चाकूचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर गँगरेप, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
एवढंच नव्हे तर पोलिसांबरोबर आलेल्या अज्ञात व्यक्तीने पीडित जोडप्याला साडेपाच लाख रुपये न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. यावेळी आरोपी राकेश कुमार याने पीडितेला मारहाण करत तिच्याबरोबर जबरदस्ती केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीने पीडितेला वारंवार फोन करून तिचा छळ केला. तसेच तिच्या घरीही भेट दिली. आरोपी राकेश कुमारने १९ सप्टेंबर रोजी पीडितेला त्रास देण्यासाठी फोन केला पण तिने पुरावा म्हणून त्यांचं संभाषण रेकॉर्ड केलं. यानंतर अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून जोडप्याने तिघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मिळताच आरोपी राकेश कुमार कथितपणे पीडितेच्या घरी आला आणि त्याने तिला धमकावले. दहा दिवस छळ सहन केल्यानंतर अखेर पीडित जोडप्याने २८ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.