Woman Raped in Hyderabad by Childhood Friend: नवी नोकरी लागल्याच्या निमित्ताने हॉटेलमध्ये पार्टी देणाऱ्या तरुणीवर तिच्याच बालपणीच्या मित्रानं त्याच्या भावासह सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये हा प्रकार घडला असून सदर तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचंही तपासात निष्पन्न झालं. पाडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरुणीला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमकी घटना काय?
सोमवारी रात्री हैदराबादमधील वनस्थळीपुरममध्ये ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित तरुणीनं तिला नवीन नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या बालपणीच्या मित्राला वनस्थळीपुरममधील एका हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. गौतम रेड्डी असं या मित्राचं नाव असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यावेळी, या मित्राचा चुलत भाऊही तिथे आला होता.
पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार, तिने व तिच्या मित्राने मद्य घेतल्यानंतर त्याने तरुणीला हॉटेलमधल्याच एका खोलीत नेले. तिथे दारूच्या नशेत असताना तिच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचा चुलत भाऊही हॉटेलच्या खोलीत आला आणि त्यानंही तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरून दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
भावाला फोन आणि पोलिसांत तक्रार
दरम्यान, घडल्या प्रकारामुळे प्रचंड धक्का बसलेल्या अवस्थेत पीडित तरुणीनं तिच्या भावाला फोन केला आणि सगळी हकीगत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
चालत्या बसमध्येच विवाहित महिलेवर बलात्कार
दरम्यान, तेलंगणामध्ये अशाच एका घटनेत चालत्या बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर महिला निर्मल या ठिकाणावरून प्रकाशम जिल्ह्यात एका खासगी प्रवासी बसमधून जात होती. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून बसच्या चालकानं कापडाच्या तुकड्यानं महिलेचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी बसच्या दुसऱ्या एका चालकाला ताब्यात घेतलं असून आरोपीचा तपास केला जात आहे.