उत्तराखंडमधील डेहराडूनजवळ मसुरी येथे असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) नव्याने भरती झालेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण अकादमीत एक अज्ञात महिला गेले सहा महिने मुक्काम ठोकून निघून गेल्याची धक्कादायक बाब निदर्शनाला आली आहे.
 या संदर्भात अकादमीचे प्रशासकीय अधिकारी सत्यवीर सिंग यांनी मंगळवारी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उजेडात आले. आपण प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून ही महिला २० सप्टेंबर रोजी अकादमीत आली. तिने आपली ओळख रुबी चौधरी अशी सांगितली. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथून ती आली होती. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ अकादमीत वास्तव्य करून २७ मार्च रोजी ती अचानक निघून गेली.
अकादमीतील प्रशिक्षणार्थीच्या ही बाब लक्षात येईपर्यंत ती निघून गेली होती, असे डेहराडूनचे पोलीस अधीक्षक पुष्पक ज्योती यांनी सांगितले. तिच्या शोधासाठी खास पथक नेमले आहे. ती ज्या खोलीत राहत होती तेथून सापडलेल्या कागदपत्रांचा कसून तपास केला जात आहे. आपल्या वास्तव्यात ती अकादमीच्या ग्रंथालयात नेहमी जात असे, असे दिसून आले आहे.
मसुरीची आयएएस प्रशिक्षण अकादमी देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. त्यामुळे ती दहशतवाद्यांच्या कायम निशाण्यावर राहिली आहे. अशा महत्त्वाच्या संस्थेत एखादी अनोळखी महिला खोटी ओळख सांगून इतके दिवस बिनदिक्कतपणे कशी काय राहू शकते, तिच्याबद्दल इतक्या दिवसांत कोणालाही कसा संशय येत नाही आणि ती अचानक गायब कशी होऊ शकते, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस तिचा तपास करीत आहेत.
 

Story img Loader