Karnataka Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी घटना कर्नाटकात घडली आहे. एक मुलगा त्याच्या प्रेयसीबरोबर पळून गेल्याने त्याच्या आईलाच मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नुसतं मारहाण नाही तर आईला विवस्त्र करून विजेच्या खांबाला बांधण्यात आलं होतं. या घटनेमुळे कर्नाटकात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
बेळगाव शहरापासून ९ किमी अंतरावर असलेल्या होसा वंतमुरी गावात मध्यरात्री १ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली. होसा वंतमुरी येथेच कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. “२४ वर्षीय मुलाचे १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी तिचं लग्न दुसऱ्याबरोबर करण्याचे ठरवले. त्यानुसार, सोमवारी तिचा साखरपुडा होणार होता. परंतु, त्याआधीच हे जोडपं पोळून गेलं”, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >> कर्नाटकच्या प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये आढळला तिघांचा मृतदेह; पोलीस म्हणाले, “मुलीची हत्या करून आई-वडिलांनी…”
जोडपं पळून गेल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या आईला लक्ष्य केलं. त्याच्या घरी जाऊन आईवर हल्ला केला. तिला विवस्त्र करून विजेच्या खांबाला बांधण्यात आलं. विजेच्या खांबाला बांधून तिला मारहाण करण्यात आली, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, पीडित आईला उपचारांसाठी बेळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर, फरार झालेल्या जोडप्याचा शोधून पोलिसांकडून घेतला जात आहे.
हे प्रकरण कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांच्यापर्यंत पोहोचले असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली. हे अमानवी कृत्य असून दोषींवर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही हे अमानुष कृत्य आणि समाजाला लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. “आमचे सरकार अशा घटना सहन करणार नाही. याप्रकरणी अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेल”, असंही ते पुढे म्हणाले.
बेळगावचे पोलीस आयुक्त एसएन सिद्धरामप्पा यांनी घटनास्थळी कर्नाटक राज्य राखीव पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत.