एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे टर्कीत हाहाकार उडाला आहे. सोमवारी तीन मोठे भूंकप झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. दरम्यान, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अशात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
या घटनेचा व्हिडीओ कुर्दीश पत्रकार होशांग हसन यांनी शेअर केला असून हा व्हिडीओत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून हा एक दैवी चमत्कार असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.
हेही वाचा – Video: तुर्कीत दोन दिवसात पाच हादरे; आतापर्यंत काय घडलं?
दरम्यान, टर्कीमध्ये झालेल्या पाच भीषण भूकंपांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. तर आतापर्यंत आठ हजारांपेक्षा जास्त जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. या भूकंपग्रस्तांना वसतिगृहे आणि विद्यापीठांमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिली आहे.