परदेशातून परत आल्याची माहिती डॉक्टरांपासून लपवणाऱ्या एका उद्योजकाच्या ५५ वर्षीय पत्नीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. परदेशातून परतल्यानंतर या महिलेला त्रास सुरू झाला. ही महिला दयानंद वैदयकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेली होती. मात्र, त्यावेळी तिने स्वतःच्या प्रवासाची माहिती डॉक्टरांपासून लपवली. कालावधीनंतर तिला करोनाची लागण झाल्याचं रिर्पोटमधून समोर आलं आहे. त्यामुळे दोन डॉक्टरांसह या महिलेच्या कुटुंबाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.
करोनाची लागण झालेली ही महिला लुधियानातील एका प्रसिद्ध उद्योजकाची पत्नी आहे. ती कपड्याचं स्टोअर चालवते. काही दिवसांपूर्वी महिला स्पेनला गेली होती. त्यानंतर ही महिला डीएमसीएच रुग्णालयात त्यावेळी तिने स्पेनमधील प्रवासाची डॉक्टरांना माहितीच दिली नाही. मात्र, तिचे स्वॅब नमुने पटियाला प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात महिलेला महिलेला करोनाचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं.
याविषयी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेश बग्गा म्हणाले,’महिलेनं तिची परदेशातून प्रवास केल्याची माहिती डॉक्टरांपासून दडवून ठेवली. त्यानंतर महिलेचा स्वॅब पटियाला प्रयोगशाळेत तपासण्यात आला. त्यात ही महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे स्वॅब पाठवण्यात आला आहे. त्याचे रिर्पोट अजून आलेले नाही. मात्र, आम्ही महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन्ही डॉक्टरांना क्वारंटाइन केलं आहे. त्याचबरोबर एका डॉक्टरच्या पत्नीसह मुलाला विलगीकरण कक्षात ठेवलं आहे,’ अशी माहिती बग्गा यांनी दिली.
‘रिर्पोट आल्यानंतर ही महिला स्पेनमधून परत आल्याची माहिती आम्हाला कळाली. या महिलेचा पती, मुलगी आणि घरात कामाला असलेल्या दोघांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सध्या ही महिला कुणाला भेटली, त्या सगळ्यांची माहिती काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ती कुठे फिरली याचीही माहिती काढण्याचं काम सुरू आहे, असंही बग्गा म्हणाले.