आयएएस अधिकारी असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून उत्तराखंडच्या मसुरी शहरातील प्रतिष्ठीत लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत बिनधास्तपणे तब्बल सहा महिने मुक्काम ठोकणाऱया एका महिलेने गुरूवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. अकादमीतील एका अधिकाऱयाने नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल पाच लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच त्या अधिकाऱयानेच आपल्याला अकदामीत राहण्यासाठी खोटे ओळखपत्र बनवून दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
रुबी चौधरी नावाच्या महिलेने आयएसएस अधिकारी असल्याचे भासवून गेले सहा महिने या अकादमीत मुक्काम ठोकला आणि फरार झाली. ती फरार झाल्यानंतर तिने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले. यानंतर आरोपी रुबी चौधरीने गुरूवारी स्वत:हून माध्यमांसमोर येऊन हा खळबळजनक खुलासा केला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात एका कार्यक्रमात संबंधित अधिकाऱयाशी ओळख झाल्याचे रुबी चौधरीचे म्हणणे आहे. त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये अकादमीच्या कॅम्पसला पहिल्यांदा भेट दिली होती. तसेच अकादमीतील ग्रंथालयात नोकरीसाठी अर्ज देखील दाखल केल्याचा दावा रुबी चौधरीने केला आहे. त्यावर माझ्याकडे अधिकाऱयाने नोकरीसाठी पाच लाखांची मागणी केली. आपण अधिकाऱयावर विश्वास ठेवून पाच लाख रुपये दिले एवढीच माझी चूक झाल्याचेही तिचे म्हणणे आहे. मात्र, पैसे देऊनही नोकरी काही मिळाली नाही.त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणी अकादमीचे उपसंचालक सौरभ जैन यांच्याकडून खुलासा मागवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा