भारताला वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवून देणाऱ्या काही महिला कुस्तीपटू गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. विनयभंगाच्या अनेक प्रसंगांचा खुलासा त्यांनी आपल्या आरोपांमध्ये आणि पोलिसांत केलेल्या तक्रारीत केला आहे. हे सर्व आरोप ब्रिजभूषण सिंह यांनी फेटाळून लावले आहेत. एकीकडे यातल्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी लैंगिक छळाचे खोटे आरोप आपण केल्याचा दावा केला असताना दुसरीकडे या प्रकरणातील एक साक्षीदार आंतरराष्ट्रीय रेफरींनी धक्कादायक जबाब नोंदवला आहे.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांची माघार!
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये अल्पवयीन कुस्तीपटूचाही समावेश होता. मात्र, आता आपण ब्रिजभूषण यांच्यावरील रागातून हे आरोप केल्याचा दावा अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी पीटीआयशी बोलताना केला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. मात्र, दुसरीकडे या प्रकरणातील एक साक्षीदार असणारे आंतरराष्ट्रीय रेफरी जगबीर सिंग यांनी त्यांच्या जबाबात मोठा दावा केला आहे.
कोण आहेत जगबीर सिंग?
जगबीर सिंग हे २००७ पासून कुस्ती सामन्यांसाठीचे आंतरराष्ट्रीय रेफरी म्हणून काम करतात. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्थेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी भारतासाठी सुवर्णपदकाची कमाईही केली आहे. सध्या ते आंतरराष्ट्रीय रेफरी आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम पाहातात.
गेल्या वर्षी ‘त्या’ सामन्यानंतर नेमकं काय घडलं?
दरम्यान, जगबीर सिंग हे या प्रकरणातील एकूण १२५ साक्षीदारांपैकी एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. एका महिला कुस्तीपटूने गेल्या वर्षी एशियन चॅम्पियनशिपच्या ट्रायल्समधील अंतिम सामन्यानंतर घडलेला एक प्रसंग आपल्या तक्रारीत नमूद केला आहे. यात ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या पार्श्वभागाला हात लावल्याचा आरोप तिनं केला असून जगबीर सिंग यांनी आपल्या जबाबात तो प्रसंग सांगितला आहे.
“मी पाहिलं की ब्रिजभूषण तिच्या बाजूला उभे होते. काहीतरी झालं आणि तिनं अचानक स्वत:ला सोडवून घेतलं, ती लांब झाली. काहीतरी पुटपुटली. ती तेव्हा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या बाजूला उभी होती, पण नंतर पुढच्या रांगेत आली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी पाहात होतो. ती अस्वस्थ झाली होती. तिच्याशी काहीतरी चुकीचं घडलं होतं. मी ब्रिजभूषण यांना हे करताना पाहिलं नाही. पण त्यांचे हात-पाय फार चालतात. इकडे ये, तिकडे जा, इकडे उभी राहा असं म्हणत ते कुस्तीपटूंना हात लावत असतात. त्या दिवशी काहीतरी चुकीचं घडलं होतं हे नक्की”, असं जगबीर सिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात नमूद केलं आहे.
कुस्तीपटूचा आरोप काय?
त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाबाबत एका महिला कुस्तीपटूनं आपल्या तक्रारीत उल्लेख केला आहे. “मी तिथल्या काही उंच कुस्तीपटूंपैकी होते. त्यामुळे टीम फोटोसाठी सगळ्यात मागच्या रांगेत उभं राहाणं अपेक्षित होतं. मी तिथे उभी असताना आरोपी ब्रिजभूषण सिंह माझ्या बाजूला येऊन उभे राहिले. मला अचानक माझ्या पार्श्वभागावर एक हात असल्याचं जाणवलं. मी मागे वळून बघितलं तर मला धक्काच बसला. तो ब्रिजभूषण यांचा हात होता. मी लगेच तिथून दूर झाले. पण मला त्यांनी खांद्याला धरून जबरदस्तीने तिथे थांबवायचा प्रयत्न केला. मी प्रयत्नपूर्वक त्यांच्या हातातून सोडवणूक करून घेतली. टीम फोटो काढून घेणं क्रमप्राप्त असल्यामुळे मी पुढच्या रांगेत जाऊन बसले”, असं या महिला कुस्तीपटूनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.