तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादाची दखल आता केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांनीसुद्धा घेतली आहे. तनुश्री १० वर्षांनंतर या प्रकरणावर बोलत आहे पण तरीही आपला तनुश्रीला पाठिंबा आहे असं मेनका गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
‘Metoo’ सारखी ‘Metooindia’ मोहीम व्यापक पद्धतीनं राबवली पाहिजे, याद्वारे उशीरा का होईना पण महिला आपल्यावर झालेल्या अन्याविरुद्ध खुलेपणाने बोलतील, समोर येतील असं मत त्यांनी मांडलं आहे. एखादी महिला किती उशीरा न्याय मागायला समोर येते हे महत्त्वाचं नाही हॉलिवूडमध्येही खूप उशीरा अभिनेत्रींनी आवाज उठवला होता. मात्र त्यांनी ‘Metoo’ सारखी मोहीम यशस्वी करून दाखवली. त्यामुळे जर खरंच एका महिलेवर अन्याय झाला असेल तर तिला न्याय मिळालाच पाहिजे असं सांगत मेनका गांधी यांनी तनुश्रीला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
तनुश्री- नाना पाटेकर यांच्या वादाबद्दल विचारले असता महिलांसोबत कोणत्याही प्रकारचं असभ्य वर्तन खपवून घेतलं जाणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन केले तसेच आवाज उठवल्यानंतर मनसेकडून आपल्याला धमकावल्याचा गंभीर आरोपही तिनं केला होता.
या आरोपानंतर प्रियांका चोप्रा, ट्विंकल खन्ना, रेणूका शहाणे, तापसी पन्नू, फरहान अख्तर यासारखे बॉलिवूडमधले बडे कलाकार तिच्यापाठीमागे उभे राहिले. तर दुसरीकडे ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’नं या प्रकरणात तिची माफी मागितली आहे. तनुश्रीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ‘सिंटा’कडून आम्ही माफी मागतो, खरं तर माफी मागून तिला झालेला त्रास आम्ही कमी करू शकत नाही. पण तिच्यासोबत झालेला प्रकार अन्य कोणत्याही कलाकारासोबत घडणार नाही याची आम्ही पुरेपुर काळजी घेऊ. ‘ असं ‘सिंटा’नं म्हटलं आहे.