शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : देशभरात कुटुंबातील किमान एका व्यक्तीला आरोग्य विमा कवच प्राप्त होण्याचे प्रमाण पाच वर्षांमध्ये ११ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र अजूनही हे प्रमाण तुलनेने फार कमी असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत आरोग्य विमा संरक्षण असलेल्या महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे या अहवालात मांडले आहे.
देशभरात कुटुंबातील किमान व्यक्तीला आरोग्य विमा कवच असलेल्या कुटुंबांचे प्रमाण ४१ टक्के आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २९ टक्के होते. १५ ते ४९ वयोगटातील व्यक्तींना आरोग्य विमा संरक्षणाची नोंदणीही या अहवालात केली आहे. यानुसार देशभरात या वयोगटातील ३० टक्के महिलांनाच आरोग्य विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. पुरुषांमध्ये मात्र हे प्रमाण सुमारे ३३ टक्के आहे. मागील अहवालात महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे २० टक्के तर पुरुषांमध्ये सुमारे २३ टक्के होते. गेल्या पाच वर्षांमध्ये महिला आणि पुरुष या दोन्हीच्या विमा संरक्षणामध्ये सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट होते.
महिलांमध्ये ३५ ते ४९ वयोगटामध्ये विमा संरक्षणाचे प्रमाण तुलनेने जास्त असून ३५ वर्षांखालील स्त्रिया आणि मुलींमध्ये विमा संरक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. पुरुषांमध्ये हीच स्थिती असून ५० ते ५४ वयोगटातील पुरुषांमध्ये विमा संरक्षणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे.
राज्य आरोग्य विमा योजनेचे सर्वाधिक लाभार्थी
देशभरात विमा संरक्षण असलेल्या कुटुंबांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४६ टक्के लाभार्थी हे राज्य आरोग्य विमा योजनेचे आहेत. त्यामुळे विमा संरक्षण प्राप्त कुटुंबांमध्ये वाढ होण्याचे कारण राज्य आरोग्य विमा संरक्षणाची वाढलेल्या व्याप्ती असेच यातून स्पष्ट होते. या खालोखाल २६ टक्के लाभार्थी हे इतर विमा योजनाचे आहेत. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेतील कुटुंबाची संख्या १६ टक्के तर केंद्रीय आरोग्य विमा योजनेचे सुमारे आठ टक्के कुटुंबे लाभार्थी आहेत.
खासगी कंपन्यांमार्फत विमा संरक्षणाचे प्रमाण कमीच
खासगीरीत्या घेतेलेल्या व्यावसायिक विमा योजनेचा फायदा केवळ तीन टक्के कुटुंबांनाच मिळाला आहे. यामध्ये सर्वाधित सुमारे १२ टक्के उच्च वर्गातील आहेत. खासगी कंपन्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विमा संरक्षणाचे लाभार्थी केवळ १.१ टक्के आहे, तर कंपन्यामार्फत वैद्यकीय भरपाई मिळणाऱ्या कुटुंबाची संख्या ०.७ टक्के आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील कुटुंबे वंचित
आर्थिकदृष्टय़ा सक्षम कुटुंबाच्या तुलनेत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील कुटुंबामध्ये विम्याचे संरक्षण कमी आहे. या घटकामध्ये ३६ टक्के कुटुंबाना विमा कवच प्राप्त झाले आहे तर या वरील गटामध्ये हे प्रमाण ४० ते ४४ टक्के आहे. एनएफएचएस ४ मध्ये हे प्रमाण आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमध्ये २१ टक्के तर त्यावरील घटकांमध्ये ३० ते ३२ टक्के होते.
राज्यात विमाधारक कुटुंबांचे प्रमाण २२ टक्के
राज्यात विमाधारक कुटुंबाचे प्रमाण २२ टक्के आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण १५ टक्के होते. यात महिलांचे प्रमाण सुमारे आठ टक्के तर पुरुषांचे प्रमाण सुमारे १३ टक्के होते. आता हे प्रमाण महिला आणि पुरुषांमध्ये अनुक्रमे १४ आणि १५ टक्के आहे.