एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघुशंका करणाऱ्या मुंबईतील शंकर मिश्रा याला त्याच्या कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून सध्या तो फरार आहे. दरम्यान, शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी आपल्या मुलाची पाठराखण केली आहे. माझ्या मुलाने त्याच्या वयाच्या महिलेशी याआधी कधीही गैरवर्तन केलेले नाही. मग तो एका ७२ वर्षीय महिलेशी गैरवर्तन कसा करू शकतो? माझ्या मुलाला ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोप शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी केला आहे.
हेही वाचा >> धक्कादायक! सहा वर्षांच्या मुलाचा शिक्षिकेवर गोळीबार
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार श्याम मिश्रा यांनी माझ्या मुलाला फसवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, असा दावा केला आहे. “त्या महिलेने काही पैशांची मागणी केली होती. तिने मागितलेली रक्कमही नंतर देण्यात आली होती. मात्र पुढे काय झाले, याबाबत मला कल्पना नाही. तिने माझ्या मुलाकडे आणखी काही मागणी केली असावी. मागणी पूर्ण न करू शकल्यामुळेच महिलेकडून माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जात असावा,” असा दावा श्याम मिश्रा यांनी केला.
हेही वाचा >> “जी नंगानाच करत फिरतेय, तिला…”, महिला आयोगाच्या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांचा संताप
“माझा मुलगा थकलेला होता. त्याला दोन दिवसांपासून झोप नव्हती. याच कारणामुळे विमानात दिले जाणारे मद्य पिऊन तो झोपी गेला होता. माझा मुलगा महिलेच्या अंगावर लघुशंका करू शकत नाही. त्याने त्याच्या वयाच्या महिलेशीही आतापर्यंत कधी गैरवर्तन केल्याचे मी पाहिलेले नाही. मग तो ७२ वर्षीय महिलेसोबत असे कसे वागू शकेल,” असेही श्याम मिश्रा म्हणाले आहेत.
हेही वाचा >> Delhi Accident : कंझावाला अपघात प्रकरणातील सातव्या आरोपीचे आत्मसमर्पण; दिल्ली पोलिसांची माहिती
नेमकं प्रकरणं काय आहे?
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकारानंतर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार करू नये म्हणून आरोपीनं त्यांची लेखी माफी मागितली. पोलिसांत तक्रार केल्यास त्याचा पत्नी आणि मुलांवर वाईट परिणाम होईल, अशी याचना आरोपीने केली होती. यानंतर पीडित महिलेनं आरोपीला माफ करून पोलिसांत तक्रार करणं टाळलं होतं. मात्र अलीकडेच एअर इंडिया कंपनीने आरोपी शंकर मिश्रा याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच मिश्रा याच्यावर ३० दिवस विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.