सोशल मीडियावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या सोबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर एका तरुणीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नेटकऱ्यांच्या आक्षेपार्ह कमेंट्सनंतर या तरुणीने हा फोटो काढून टाकला आहे. या प्रकारानंतर शशी थरुर यांनी नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “शंभराहून अधिक लोकांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात माझ्यासोबत फोटो काढल्यामुळे तरुणीला नाहक त्रास सहन करावा लागला. याच कार्यक्रमात मी जवळपास पन्नासहून अधिक लोकांसोबत फोटो काढले”, असे थरुर यांनी म्हटले आहे.
“गैरवर्तनामुळे खराखुऱ्या लोकांना त्रास होतो, हे ट्रोलर्संना समजलं पाहिजे. अशा लोकांनी त्यांचे दुषित विचार स्वत: जवळच ठेवले पाहिजेत”, अशी टीका थरुर यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर तरुणीने स्पष्टीकरण दिले आहे. या फोटोचा कुठल्याही वैयक्तीक किंवा राजकीय मुद्द्याशी संबंध नाही, असे या तरुणीने म्हटले आहे. आपल्याला आमंत्रित करण्यात आलेल्या एका साहित्य संमेलनात हा फोटो काढल्याचंही या तरुणीनं सांगितलं आहे.
“शशी थरुर यांच्यासोबतचा माझा फोटो चुकीच्या अर्थानं वापरला गेल्यानं माझं मन दुखावलं आहे. काही लोक राजकीय फायद्यासाठी चुकीची माहिती पसरवत आहेत”, असा आरोप या तरुणीनं केला आहे. ज्या लोकांनी किंवा पेजेसने हा फोटो वापरला आहे, त्यांनी तो काढून टाकावा, अशी विनंतीदेखील या तरुणीनं केली आहे.