श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर हिंदू संघटनांमध्ये प्रचंड रोष आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध संघटनांकडून देशभरात आंदोलनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज ‘हिंदू एकता मंच’नेही दिल्लीतील छतरपूर येथे ‘बेटी बचाओ महापंचायत’ आयोजित केली होती. मात्र, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाषण देण्यासाठी चढलेल्या महिलने एका व्यक्तीला चपलेने मारल्याचा प्रकार घडला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून या महिलेची मुलगी बेपत्ता आहे. त्यामुळे आपली कैफियत मांडण्यासाठी ती महिला ‘बेटी बचाओ महापंचायत’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती व्यासपीठावरून बोलत असताना शेजारी असलेल्या व्यक्तीने तिला बाजुला करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, तिला बोलू न दिल्याच्या रागातून तिने त्याला मारहाण केल्याची माहिती आहे.
हेही वाचा – Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
”माझी मुलगी बेपत्ता असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी मी पोलीस ठाण्याच्या चकरा मारते आहे. मात्र, पोलीस माझी तक्रार लिहून घेत नाहीत”, अशी प्रतिक्रिया तिने माध्यमांशी बोलताना दिली आहे. ”आज या लोकांनी ‘बेटी बचाओ महापंचायत’ आयोजित केली आहे. पण जेव्हा नेते मंडळीच मुलीवर डोळा ठेऊन असतील तर आमच्या मुलींना कोण आणि कसं वाचवणार?” असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. दरम्यान, हा विषय महिलेचा घरघुती विषय असून पोलीस तिच्या मुलीचा शोध घेत आहेत, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली आहे.