अनेकदा मंत्री मोठमोठ्या घोषणा करतात आणि थेट जाहीर कार्यक्रमांना येऊन आपली पाठ थोपटून घेतात. मात्र, प्रत्यक्षात अशा कार्यक्रमांना अधिकाऱ्यांनी अगदी नियोजनबद्धपणे एकतर्फी चित्र रंगवलेलं दिसतं. मात्र, त्यातही एखादा सजग नागरिक या व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करतोच. असंच एक उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळालं. बिहारमधील पाटणात केंद्रीय मंत्र्यांनी कामगार कार्ड वितरणाच्या कार्यक्रमात एका महिला कामगाराला हे कार्ड फ्री मिळालं ना? असा प्रश्न विचारला. त्यावर या महिला कामगाराने अधिकारी आणि मंत्र्यांसमोरच या कार्डसाठी पैसे दिल्याचं उत्तर दिलं. यानंतर अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली.
महिला कामगाराच्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सार्वजनिक मंचावर झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल पाहून केंद्रीय राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले.
बिहार सरकारला भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश
सार्वजनिक मंचावरच कामगार ओळखपत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या या महिला कामगाराचं नाव किरण देवी असं आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी बिहार सरकारला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. सरकारी कामात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, अशी ताकीद तेली यांनी बिहार सरकारला दिलीय. तसेच अशी प्रकरण घडायला नको, असंही नमूद केलं.
हेही वाचा : यंत्रणेचे काम हे कोणाला घाबरवण्याचे असू नये, पंतप्रधान मोदी यांनी CVC, CBI ला दिला सल्ला
दुसरीकडे, सोशल मीडियावर लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय. तसेच बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील सरकारवर निशाणा साधलाय. नितीश सरकारमध्ये कोणतंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. बिहारमध्ये अधिकारी आणि भ्रष्टाचाऱ्यांचं राज्य आहे, असे आरोप लोक करत आहेत. तसेच विश्वास बसत नसेल तर छापेमारी करा, अधिकारी, मंत्री, ठेकेदार यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती सापडेल, असं मत लोक व्यक्त करत आहेत.