ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या समोर येताना दिसत आहेत. यामध्ये काही ठिकाणी आर्थिक फसवणूक झालेली असते तर काही ठिकाणी शारिरीक शोषणाचे प्रसंग पीडितांवर ओढवतात. बंगळुरूमध्ये असाच एक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघड झाला असून यात आर्थिक आणि शारिरीक अशा दोन्ही प्रकारच्या फसवणुकीचा सामना पीडितेला करावा लागला आहे. विशेष म्हणजे फसवणूक झालेली २९ वर्षीय महिला ही पेशानं वकील आहे. आरोपींनी तब्बल ३६ तास या महिलेशी स्काईपवर व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण केलं. त्यात नार्कोटिक्स चाचणीच्या नावाखाली या महिलेचा नग्न व्हिडीओही रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदर महिलेनं हिंमत करून पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमुळे हा सगळा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी संबंधित आरोपींचा तपास करायला सुरुवात केली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याचं यात म्हटलं आहे.

कशी झाली महिलेची ऑनलाईन फसवणूक?

३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पीडित महिलेला एक फोन कॉल आला. त्यावर आपण ‘फेडएक्स’ या कुरियर कंपनीतून बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. मात्र, पुढे त्यानं जे काही सांगितलं, ते ऐकून महिलेला धक्का बसला. ‘तुमच्या नावाने थायलंडला जाणाऱ्या एका पार्सलमध्ये १४० ग्रॅम ड्रग्ज सापडलं आहे’, असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. नंतर या व्यक्तीने फोन कॉल आपण मुंबई पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे दिला.

या व्यक्तीने पीडित महिलेला व्हिडीओ कॉलिंगसाठी स्काईप सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानंतर सुरू झालेला व्हिडीओ कॉल पुढचे ३६ तास चालणार होता याची पीडित महिलेला कोणतीही कल्पना नव्हती.

बँक बॅलन्स आणि उत्पन्नाचीही चौकशी!

‘तुमचा आधार क्रमांक मानवी तस्करी आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारांसाठी वापरण्यात आला आहे’, असं सांगून समोरील व्यक्तीने हा कॉल अभिषेक चौहान अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या व्यक्तीकडे दिला. या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याने पीडित महिलेचा बँक बॅलन्स आणि उत्पन्न यांचीही विचारणा केली. शिवाय संवेदनशील प्रकरण असल्याचं सांगत या प्रकरणाची माहिती पोलिसांसह इतर कुणालाच न देण्याची शपथच त्यानं महिलेला घ्यायला लावली.

पुण्यात सामोशामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे; एकाला अटक…

या महिलेचं खातं असणाऱ्या बँकेतील एक कर्मचारी खातेदारांच्या खात्यांचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी करत असल्याचं या व्यक्तीने महिलेला स्काईप कॉलवर सांगितलं. यानंतर त्यानं महिलेला तिचा कॅमेरा ऑन करून ठेवायला सांगितला. अगदी ती झोपलेली असतानाही हा कॅमेरा ऑन ठेवण्याची ताकीदच त्यानं महिलेला दिली.

दुसऱ्या दिवशी केली पैशांची मागणी

दरम्यान, दुसऱ्या दिवशी ४ एप्रिलला या महिलेकडे चौहाननं तिच्या खात्यातील सर्व रक्कम दुसऱ्या एका खात्यात व्यवहारांची माहिती घेण्याकरता ट्रान्सफर करायला सांगितली. त्यानुसार महिलेनं १० लाख ७० हजारांची रक्कम ट्रान्सफर केली. यानंतर तिला पुढील सूचना मिळेपर्यंत खोलीतून बाहेर न पडण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर महिलेचं क्रेडिट कार्ड वापरून त्यांनी एकूण ४ लाखांचे दोन ट्रान्झॅक्शन्स केले.

कॉलवरच महिलेचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला

यानंतर ४ एप्रिलला रात्री चौहाननं महिलेला नार्कोटिक्स चाचणीच्या नावाखाली स्काईप कॅमेरा ऑन असतानाच नग्न व्हायला सांगितलं. सांगतो तसं न केल्यास आपण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना अटक करू, तुम्हाला जीवे मारू, अशी धमकीच त्यानं दिली. हे सर्व झाल्यानंतर चौहाननं पीडित महिलेकडे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास नग्न व्हिडीओ डार्क वेबवर विकू, अशी धमकी त्यानं महिलेला दिली. एव्हाना आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलेल्या महिलेनं घाबरलेल्या अवस्थेत व्हिडीओ कॉल बंद केला. त्यावेळी ५ एप्रिलचे पहाटेचे १ वाजून १५ मिनिटं झाले होते.

दुसऱ्या दिवशी महिलेनं पोलिसांत जाऊन सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी खंडणी आणि फसणवुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास घेतला जात आहे. दरम्यान, फेडएक्स कुरिअर कंपनीनं ग्राहकांची कोणतीही वैयक्तिक माहिती अशा प्रकारे फोन कॉलवर, मेलवर किंवा व्हिडीओ कॉलवर मागितली जात नाही, असं स्पष्ट केलं आहे. जर कुणालाही अशा प्रकारचे संशयित फोनकॉल किंवा मेसेजेस आले, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही कंपनीकडून करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women lawyer duped online fraud case in bengaluru made to strip on camera in video call pmw