त्रिपुरातल्या धलाई जिल्ह्यात काल एका ४६ वर्षीय बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला महिलांच्या गटाने बेदम मारहाण केली आहे. गंडाचेरा पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे. या महिलांनी या आरोपीला झाडाला बांधून मारहाण केली आहे. या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला आहे.


एका खुनाच्या गुन्ह्यात आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगलेल्या मृताने मंगळवारी रात्री आईसोबत धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला जवळच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि त्या मुलीला तिथेच घटनास्थळी सोडून दिलं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.


मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिला वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांनी आरोप केला की मुलीला शेवटचे आरोपीसोबत पाहिले होते आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी गंडाचेरा-अमरपूर महामार्ग रोखून धरला, असंही पोलिसांनी सांगितलं.


मात्र, बुधवारी सकाळी महिलांच्या टोळक्याने त्याला जवळच्या गावातून पकडून झाडाला बांधले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये महिला आरोपीला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपीची सुटका करण्यात आली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Story img Loader