मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढावं म्हणून सरकारने अनेक उपाययोजना आणल्या आहेत. मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अनेक सुविधाही दिल्या जातात. सरकार पातळीवर मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रमही राबवले जातात. त्यासाठी बेटी बचाव बेटी पढाओ या ब्रीदवाक्याअंतर्गत मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जातं. पण नेमकं हेच ब्रीदवाक्य महिला आणि बालविकास मंत्र्यांकडून चुकलं तर? एखाद्या केंद्रीय मंत्र्यांकडून अशी चूक होऊ शकते, यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर खाली दिलेला व्हिडीओ जरूर पाहा.

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील ब्रह्मकुंडी येथील एका सरकारी शाळेत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर स्कूल चले हम या अभियानासाठी गेल्या होत्या. या अभियानाला त्यांनी घंटी वाजवून सुरुवात केली. शाळेतील मुलांबरोबर त्यांनी काही वेळही घालवला.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरता मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही मंत्री शिक्षण विभागाची मान शर्मेने खाली घालायला लावत आहे. कारण, एका शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात फळ्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओ या ब्रीदवाक्याने करण्यात येणार होती. त्यासाठी सावित्री ठाकूर यांनी सफेद फळ्यावर लिहायला सुरुवात केली. परंतु, लिहिताना त्यांनी बेटी पढाओ बेटी बचाओ न लिहिता बेटी पडाओ बच्चाव असं अशुद्ध लेखन केलं. त्यांची हीच कृती आजूबाजूच्या कॅमेऱ्यांनी कैद केली आणि क्षणार्धात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचा >> भारतातून कोट्यधीशांचं आऊटगोईंग चालूच; यावर्षीही तब्बल ४,३०० धनाढ्य देश सोडणार

बारावी पास मंत्र्यांकडूनच चूक

सावित्री ठाकूर यांच्या निवडणूक शपथपत्रानुसार त्या १२ वी पास आहेत. परंतु, फळ्यावर लिहिताना त्यांचा गोंधळ उडाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांना प्रचंड ट्रोलही केलं गेलं. काहींनी त्यांच्या शैक्षिणक पात्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तर, काँग्रेसकडूनही त्यांची खिल्ली उडवली गेली.