हॉटेलमधल्या खोल्या किंवा स्वच्छतागृहांमध्ये छुपे कॅमेरे लावण्याचे भयंकर प्रकार आत्तापर्यंत उघड झाले असून काही प्रकरणातील आरोपींना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. पण आता थेट एका मॅटर्निटी हॉस्पिटलमधल्या सीसीटीव्ही फूटेजचे व्हिडीओच थेट यूट्यूबवर अपलोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा सगळा प्रकार गुजरातच्या राजकोट भागातील असून यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी झटकत सिस्टीम हॅक झाल्याचा दावा केला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
दोन दिवसांपूर्वी यूट्यूबवर एका रुग्णालयातले महिला रुग्णांच्या तपासणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. त्यामुळे चक्क रुग्णालयातलेच व्हिडीओ अशा प्रकारे व्हायरल केले जात असतील तर महिलांना सुरक्षित उपचारदेखील मिळणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि संबधित चॅनलवरून हे व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले.
हे सगळे व्हिडीओ राजकोटमधील एका मॅटर्निटी होममधील असल्याचं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हॉस्पिटलच्या चेकअप रुममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फूटेजचे हे व्हिडीओ आहेत. महिला रुग्णांची तपासणी करतानाचे हे व्हिडीओ यूट्यूबवर कुणी अपलोड केले? याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, रुग्णालयाची सीसीटीव्ही यंत्रणा हॅक झाली असण्याची शक्यता असून तिथूनच व्हिडीओ व्हायरल झाले असू शकतात, असा दावाही करण्यात येत आहे. यासंदर्भात राजकोट सायबर क्राइम पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व डॉक्टरांचीदेखील चौकशी केली जात आहे.
यूट्यूब चॅनलवरून व्हिडीओ झाले व्हायरल
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व व्हिडीओ मेघा एमबीबीएस नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले होते. त्याशिवाय, या व्हिडीओसोबत इन्स्टाग्राम लिंकदेखील देण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्याभरात या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. दरम्यान, गुजरात सायबर क्राइम विभागानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक नियुक्त केलं आहे. रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचीही तपासणी केली जात आहे.