साक्षरतेबरोबरच आर्थिक स्वायत्तता प्राप्त करण्याची अहमहमिका नवतरुणींमध्ये लागली असतानाच ४४ टक्के नववधूंना आपल्यापेक्षा कमी पगार असलेल्यांशी विवाह करण्यास कोणतीही आडकाठी नसल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर जीवनसाथी.कॉम या विवाहविषयक साइटने नववधूंच्या विवाहविषयक अपेक्षांचे नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात शहरांतील ४४ टक्के नवयुवतींनी आपल्यापेक्षा कमी पगार असलेल्यांच्या गळ्यात माळ घालण्याची तयारी दर्शविली आहे.
कंत्राटदारी पद्धतीच्या नोकरीतील अनिश्चिततेमुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सध्याच्या जगात अनेक पुरुष स्वत:चा उद्योग सुरू करण्याची जोखीम पत्करतात. असा विचार वा कृती करणाऱ्यांच्या मासिक मिळकतीवर याचा निश्चित परिणाम होतो. अशा परिस्थितीत व्यावसायिक होऊ पाहणाऱ्या आपल्या नवऱ्याला साथ देण्यासाठी सध्याच्या शिक्षित विवाहितांची प्रतिमहिना मिळणारी निश्चित पगाराची नोकरी पत्करण्याची तयारी असते, असे जीवनसाथी.कॉमचे बिझनेस हेड रोहित मघनानी यांनी म्हटले आहे.
शहर सोडून अन्य भागांत राहणाऱ्या तरुणींपैकी ३३ टक्के नववधूंनीही त्यांच्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची तयारी दर्शविली असल्याचे या पाहणीत आढळून आले आहे.
पती आणि पत्नी एकाच व्यवसायात असतील तर त्यांच्या नातेसंबंधात मतभेद निर्माण होतात, असे नेहमी बोलले जाते. ही बाब खरी असल्याचेही याविषयीच्या अहवालात आढळून आले आहे. सुमारे ४६ टक्के नवतरुणींनी आपल्याच क्षेत्रातील वराशी लग्न करण्यास नकार दर्शविला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
आपले जीवनध्येय गाठण्यासाठी ५५ टक्के नवविवाहितांनी लग्नानंतरही अन्य शहरांत जाण्याची तयारी दर्शविली असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader